आज दि.२९ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

50 खोक्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं बंगाल धाडीचं लॉजिक, 27 कोटीला ट्रक लागला मग 50 कोटींना..

शिंदे गट शिवसेनेतून फुटल्यापासून ठाकरे गट त्यांच्यावर सडकून टीका करत आहे. यातील मुख्य आरोप 50 कोटी अर्थात 50 खोके घेतल्याचा आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनीच शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांच्यावर 50 खोके घेतल्याचा आरोप केला. यामुळे वातावरण आणखी चिघळले आहे. यावर आता खुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये धाड पडली तेव्हा 27 कोटी रुपयांसाठी टेम्पो लागला. मग 50 कोटींचे ट्रक का दिसले नाही? लोकांची दिशाभूल करू नका, पैशाच्या लालसेपोटी हे 40 आमदार माझ्यासोबत आले नाहीत. या पनान्स लोकांना बदनाम करण्याचं काम तुम्ही कराल तेवढं खड्यात लोक तुम्हाला टाकतील, जनाची नाही तर मनाची ठेवा. यामुळे शिवसैनिकांचं खच्चीकरण होत असल्याचा पलटवार मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. नंदूरबार येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

गडचिरोलीच्या सिंरोचा तालुक्याला भूकंपाचे धक्के; ३.८ रिश्टर स्केल तीव्रता

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात शुक्रवारी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातील उमानूर ते झिंगानूर परिसरात असून तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सिरोंचा तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे हादरे बसले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरात होते. मात्र, भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू उमानूर आणि झींगानूरमधील टेकडी परिसरात असल्याचा अंदाज आहे. हा परिसर तेलंगणा राज्याला लागून असल्याने तेथेही काही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. 

‘उडत्या बस’नंतर देशात ‘ई-हायवे’ बनवण्याची सरकारची योजना, नितीन गडकरींची भन्नाट संकल्पना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ‘उडत्या बस’ची संकल्पना मांडली होती. हा प्रकल्प पुण्यात आणण्यासाठी केंद्र सरकार निधी द्यायला तयार आहे, महापालिकेनं तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असं नितीन गडकरी म्हणाले होते. यानंतर आता नितीन गडकरी यांनी हवेतून धावणाऱ्या ‘डबल डेकर’ बसची नवीन संकल्पना सूचवली आहे.मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईत हवेत उडणारी डबल डेकर बस हवी, यावर आमचं संशोधन सुरू आहे, असं गडकरी म्हणाले. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना गडकरींनी ही संकल्पना मांडली आहे. देशात ई-हायवे तयार करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला पुन्हा अपघात, पुढच्या भागाचं नुकसान!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर १ ऑक्टोबरपासून वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. मात्र, पहिल्या महिन्याभरातच तीन वेळा या एक्स्प्रेसला छोटे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रत्येकवेळी समोर आलेल्या जनावरांना धडक दिल्याने वंदे भारत एक्स्प्रेसचं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आज सकाळच्या सुमारास तिसऱ्यावा या एक्स्प्रेसला तशाच स्वरुपाचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

आठवावा प्रताप! नागपुरात साकारली अजिंक्यतारा किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती

छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले यांचे नातं अतूट आहे. या दोन गोष्टीतील समन्वय साधला तरच शिवचरित्र खऱ्या अर्थानं समजते. शिवरायांच्या पराक्रमाचे जीवंत साक्षीदार असलेल्या या किल्ल्यांचा अलौकिक वारसा महाराजांनी आपल्या हाती सुपुर्द केला आहे. या किल्ल्यांचे महत्त्व आणि त्याचा रोमहर्षक इतिहास सर्वांना माहिती व्हावा यासाठी किल्ले साकारण्याची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. किल्लेदार प्रतिष्ठानच्या वतीने नागपुरात मागील 14 वर्षापासून ही संस्कृती जोपासण्याचं शिवकार्य सुरू आहे.

दुर्गांच्या साक्षीने घडलेल्या पराक्रमाला उजाळा देण्यासाठी दिवाळीत किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याची फार प्राचीन परंपरा महाराष्ट्रात आहे. किल्लेदार प्रतिष्ठानच्या वतीने नागपूरतील सक्करदरा लेक गार्डन परिसरात 30 फूट बाय 20 फूट अशी भव्य मराठा साम्राज्याची चौथी राजधानी किल्ले अजिंक्यताराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती साकारण्यासाठी दहा दिवसांचा अवधी लागला असून आठ ट्रक माती, बोल्डर, शेण इत्यादी साहित्य लागले आहे. राजकीय आणि संघटनात्मक कौशल्याच्या बळावर हिंदुस्थानातील सत्ता संघर्षाच्या रणधुमाळीत निर्विवादपणे बाजी मारणारे छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा दुर्लक्ष इतिहास या दुर्गाच्या रूपाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी किल्लेदार प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे. दररोज सायंकाळी दुर्गप्रेमींना इतिहासाबद्दल आणि किल्ल्याबद्दल माहिती देण्यात येते. त्यातून किल्ल्याचे महत्त्व विशद केले जाते, अशी माहिती किल्लेदार प्रतिष्ठानचे सदस्य सुधांशू ठाकरे यांनी दिली.

गुजरात निवडणुकीपूर्वी मोदी सरकार मोठा गेम खेळण्याच्या तयारीत; समान नागरी कायद्याची होणार घोषणा?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग एक नोव्हेंबर 22 ला गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकतो. ही निवडणूक दोन टप्प्यांत होऊ शकते. पहिल्या टप्प्यासाठी एक ते दोन डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्यासाठी चार ते पाच डिसेंबर रोजी मतदान होईल. तर, निकाल 8 डिसेंबरला जाहीर होईल, अशा तारखा असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच गुजरातमध्ये आचारसंहिता लागू होईल. याआधीच गुजरातमध्ये भाजप आपला शेवटचा डाव खेळण्याच्या तयारीत आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकार युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात, समान नागरी कायदा आणण्याची घोषणा करू शकतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार एक समिती तयार करू शकतं. ही समिती समान नागरी कायद्याच्या शक्यता पडताळून पाहणार आहे. त्यासाठी विविध पैलूंचं मूल्यमापन केलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या समितीचे अध्यक्ष असतील. ‘आज तक’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

छठ पूजेदरम्यान भीषण घटना, 30 हून अधिक जळाले, अनेकांची प्रकृती चिंताजनक

बिहारच्या औरंगाबादमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घरातील सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाला. दरम्यान या झालेल्या सिलिंडरच्या स्फोटामुळे 30 हून अधिक जण जळाल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहागंज परिसरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये आज पहाटे अडीचच्या सुमारास परिसरातील अनिल गोस्वामी यांच्या घरी छठ पुजेचा कार्यक्रम सुरू होता. घरातील सर्व सदस्य प्रसाद बनवण्यात व्यस्त होते. यादरम्यान घरातील सिलिंडरला आग लागली. त्यामुळे गॅस गळती होऊन आग वेगाने पसरली. यानंतर चेंगराचेंगरी झाली. काही लोकांनी आग विझवण्यास सुरुवात केली. पण आग आणखीनच वाढत गेली.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस व अग्निशमन दलाला स्थानिकांनी याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. पण हळूहळू आग वाढत गेली आणि अचानक घराचा स्फोट झाला.

थंडी वाढली, खराब हवामानामुळे मुंबईसह दिल्लीकरांना फटका, श्वसनाच्या त्रासात वाढ

देशभरात पावसाने उसंत घेतल्याने काही प्रमाणात थंडीची चाहूल लागली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये थंडीसोबत प्रदुषणात वाढ झाल्याने दिल्लीकरांचा श्वास कोंडला जात आहे. दिवाळीनंतर थंडी वाढल्याने दिल्लीसह अन्य राज्यातही थंडी सोबत प्रदुषणात वाढ झाली आहे. यूपी-बिहारसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आता थंडीने हाहाकार माजवण्यास सुरू केले आहे. दरम्यान थंडी वाढल्याने उत्तर भारतात पाऊस थांबला आहे. काही प्रमाणात दक्षिण भारतातील राज्यांनाच ढगांचा धोका असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून दिल्लीसह मुंबईतही हवामान खराब झाले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील राज्यांमध्ये उत्तर प्रदेश-बिहारसह पावसाचा कोणताही अंदाज नाही. मात्र, या भागातील तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका जाणवत आहे. मात्र पुढील चार दिवस दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर ते हिमाचल या डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमानात घट दिसून येत आहे. याचबरोबर महाराष्ट्रातही पुढचे 10 दिवस हवामान कोरडे राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

फिलिप्स- बोल्टसमोर आशिया चषक विजेते पुन्हा अपयशी, न्यूझीलंडचा ६५ धावांनी विजय

आयसीसी टी २० विश्वचषक मध्ये आज न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात ग्रुप ए मधील सामना झाला. त्यात न्युझीलंडने श्रीलंकेवर ६५ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. सिडनीमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने सात गडी गमावून १६७ धावा केल्या. किवी संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ग्लेन फिलिप्सने १०४ धावांची धडाकेबाज खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. फिलिप्सला त्याच्या शतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

स्पॅनिश टेनिसपटू राफेल नदाल पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या माध्यमातून कोर्टवर पुन्हा परतणार

स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल पुढील आठवड्यात होणाऱ्या पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेतून कोर्टवर परतणार आहे. त्याचे प्रशिक्षक कार्लोस मोया यांनी वरील माहिती दिली. दुखापतींसह नदालने यंदाचे १४वे फ्रेंच ओपन विजेतेपद जिंकले आणि पोटाच्या समस्येमुळे तो विम्बल्डनमधून बाहेर पडला. नदालने सप्टेंबरमध्ये सांगितले होते की त्याला खेळातील काही गोष्टी दुरुस्त करण्याची गरज आहे म्हणून तो पुन्हा कधी खेळेल याची चाहत्यांना खात्री वाटत नव्हती. विक्रमी २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकणाऱ्या नदालने विम्बल्डनमधून माघार घेण्यापूर्वी गेल्या महिन्यात लेव्हर चषकात दुहेरीच्या सामन्यात रॉजर फेडररसोबत सामना खेळला होता. त्याने ८ ऑक्टोबर रोजी पत्नी मेरी पेरेलोसोबत आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी सुट्टी घेतली होती.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.