देशभरातील पोलिसांचा एकाच प्रकारचा गणवेश असावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. हा केवळ चिंतनासाठी ठेवलेला प्रस्ताव असून राज्यांवर लादण्याचा प्रयत्न नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘चिंतन शिबिरा’त पंतप्रधानांनी मार्गदर्शन केले.
तरुणांची मने अतिरेकी आणि विघातक गोष्टींकडे वळवणाऱ्या शक्तींचा मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हायला हवे, असे आवाहन त्यांनी सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना केले. देशभरातील पोलिसांना एकाच प्रकारचा गणेवश असेल, तर त्याची मागणी वाढेल आणि अधिक चांगल्या दर्जाचे गणवेश तयार होऊ शकतील. शिवाय देशभरात कुठेही लोक पोलिसांना गणवेशावरून ओळखू शकतील. राज्ये त्यावर आपापल्या दलांची चिन्हे लावू शकतील, असे ते म्हणाले.
‘‘तरुणांना भरकटवणाऱ्या, बंदुका किंवा लेखणीच्या माध्यमातून पसरणाऱ्या नक्षलवादाचा बिमोड केला पाहिजे. या शक्तींना मोठय़ा प्रमाणात आंतरराष्ट्रीय मदतही मिळते,’’ असा दावा त्यांनी केला. राज्यांनी आपले जुने कायदे काळानुसार बदलावेत आणि सर्व यंत्रणांच्या समन्वयाने कायदा आणि सुव्यवस्थेला असलेल्या वाढत्या आव्हानांचा मुकाबला करावा, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली. राज्यांनी इतरांच्या अनुभवातून शिकावे आणि अंतर्गत सुरक्षेसाठी एकत्र काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आग्रह
सर्व पोलीस दलांनी सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. सायबर गुन्हे किंवा ड्रोनच्या माध्यमातून होणाऱ्या तस्करीचा उल्लेख करताना गुन्हेगार अद्ययावत होत असताना पोलिसांनीही तेवढेच आधुनिक व्हायला हवे, असे ते म्हणाले. ५जी तंत्रज्ञानाच्या फायद्यांबरोबरच सावधगिरी वाढवण्याचीही गरज निर्माण झाल्याचे मोदींनी स्पष्ट केले.