रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्ताधारी साम्यवादी पक्षाच्या परिषदेनंतर क्षी जिनपिंग यांच्या तिसऱ्या कार्यकाळात चीन धोरण बदलेल, या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.
चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गी लाव्हरोव्ह यांनी गुरुवारी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. ‘रशियासोबत संबंध अधिक दृढ करण्याची चीनची इच्छा असून विविध क्षेत्रांमध्ये द्वीपक्षीय सहकार्य वाढवण्याबाबत आशावादी आहे,’’ असे यी यांनी लाव्हरोव्ह यांना सांगितल्याचे चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. ‘‘पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशियाच्या जनतेने सर्व समस्यांवर मात करावी, यासाठी त्यांना असलेला पाठिंबा चीन भविष्यातही कायम ठेवेल,’’ असेही वँग यी यांनी स्पष्ट केले. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात जिनपिंग हे पुतिन यांचा पाठिंबा कमी करतील, असा दावा अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसींजर यांच्यासह अनेक चीन-तज्ज्ञांनी केला होता. मात्र वँग यी यांच्या विधानांमुळे हा अंदाज चुकीचा ठरवला आहे.