भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. ही मागणी होत असतानाच शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी एक विधान करून खळबळ उडवून दिली. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देणारा पहिला मीच होतो, असं विधान गुलाबराव पाटील यांनी करून चर्चेचं माहोळ उठवून दिलं आहे.
गुलाबराव पाटील यांनी संवाद साधताना हे मोठं विधान केलं आहे. मुंडे परिवाराचे काम आभाळा ऐवढे मोठे आहे. यामुळे त्यांच्या वारसदाराला कुठेतरी न्याय, सन्मान मिळेल अशी समाजाची अपेक्षा आहे. यामुळे पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागत राहील. त्यांना शिवसेनेत स्थान व सन्मान मिळेल; असं पाटील यांनी सांगितलं. पंकजा मुंडे यांचा भाजपमध्ये छळ होत असल्याने त्यांनी शिवसेनेत यावं म्हणून सर्वात पहिली मी त्यांना ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट करतानाच पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे स्वागतच राहील. प्रवेश केल्यानंतर त्यांना पद काय द्यायचे हे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील, असंही त्यांनी स्पष्ट केले.
पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षात सन्मान मिळत नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्याची पक्ष सोडण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी सर्व प्रथम आपणच त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच आहे. त्यांना पक्षात योग्य ती सन्मान दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी मागणी केली आहे. तसा सोशल मीडिया वॉर देखील समर्थकांकडून चालविला जात आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणूकीनंतर पंकजा मुंडे यांना हवे तसे प्रतिनिधीत्व मिळाले नाही. मुळात गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी पडत्या काळात खूप मोठे काम केले आहे. आता मात्र त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना संघर्ष करावा लागत आहे. भाजपने एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे यांना तिकिटेही दिली नाहीत. याचाच अर्थ ओबीसी समाजाचे कुठेतरी खच्चीकरण केले जात आहे.
यावेळी त्यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली. पूरपरिस्थती तसेच राज्यावर आलेल्या संकट काळात कोणतेही राजकारण केले जात नाही. परंतु, नारायण राणे यांची सरकारवर टीका म्हणजे डोकं फिरलया सारखी परिस्थिती आहे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावल. राज्यावर संकट आले असताना मानवता या धर्मातून केवळ मदत हाच विषय आला पाहिजे. त्यात कोणतेही राजकारण कुणीही करू नये, असंही ते म्हणाले. (फोटो क्रेडिट गुगल)