ठाण्यातील मानपाडा भागातील आयसीआयसीआयच्या बँकेतून 12 कोटींची रोकड लुटणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी पुण्यातून अटक केलीय. अल्ताफ शेख असं या 43 वर्षीय आरोपीचं नाव आहे. अल्ताफ शेख हा मुंबईचा रहिवासी आहे. तो आयसीआयसीआय बँकेत कस्टोडियन म्हणून काम करत होता. त्याने बँकेच्या लॉकरच्या चाव्या पाहिल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा एक वर्षापासून चोरीची योजना आखत होता. त्याने प्रथम बँकेच्या यंत्रणेतील त्रुटी शोधून काढल्या आणि नंतर पैसे काढण्यासाठी उपकरणे गोळा केली होती. त्याच्याकडून 9 कोटींची रोकड ताब्यात घेण्यात आली.
ICICI बँकेतून 12 कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. घटनेनंतर तब्बल अडीच महिन्यांनी ही अटक झाली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जवळपास 9 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. ICICI बँकेतून पैसे चोरीची ही घटना 12 जुलैची आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. तो 43 वर्षांचा आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये अल्ताफची बहीण निलोफरचाही समावेश आहे.
या घटनेनंतर अल्ताफ शेख फरार झाला होता. तो वेश बदलायचा आणि ओळख लपवण्यासाठी बुरखाही घालायचा. त्याची बहीण निलोफर हिला त्याच्या हालचालींची माहिती होती, असे पोलिसांनी सांगितले. त्याने काही चोरीची रक्कम घरात लपवून ठेवली होती. या प्रकरणात निलोफरला सहआरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.