विरारमधील कोव्हिड रुग्णालयाला आग,
१३ रुग्णांचा होरपळून मृत्यू
नाशिकमधील रुग्णालयामध्ये ऑक्सिजन गळती होऊन २२ जणांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आज विरारमधील कोव्हिड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झालाय. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्यरात्री आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत या रुग्णांचा होरपळून मृत्यू झालाय. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आपत्कालीन मदतनिधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
विरार दुर्घटनेच्या
चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरार दुर्घटनेचे चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. तसंच उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही याप्रकरणी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
शब्दाचा विपर्यास करू
नये एवढीच विनंती : टोपे
माध्यम प्रतिनिधीने त्यांना विरार दुर्घटनेबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल विचारल्यावर आरोग्यमंत्री टोपे यांनी “शब्दाचा विपर्यास करू नये एवढीच माझी माध्यमांना विनंती राहील”, असं बोलत याबाबत स्पष्टीकरण दिले. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये करोनाची बाधा झालेल्या १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. असं असतानाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही दुर्घटना राज्य सरकारच्या अंतर्गत बाब असून राष्ट्रीय स्तरावरील बातमी नसल्याचं म्हटल्याचं समोर आलं होतं.
ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने
२५ गंभीर रुग्णांचा २४ तासात मृत्यू
दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या २५ गंभीर रुग्णांचा गेल्या २४ तासात मृत्यू झाला आहे. रुग्णालयाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असून ऑक्सिजनवर असणाऱ्या ६० हून अधिक रुग्णांचा जीव धोक्यात आहे. ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत
दोन महिने धान्य मोफत
काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. अशावेळी हातावर पोट असण्याऱ्यांसाठी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. गरीब जनतेची हेळसांड होऊ नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा ८० कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे. या योजनेवर केंद्र सरकार २६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
निधनाचे वृत्त ऐकून
सुमित्रा महाजन संतापल्या
लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन गुरुवारी रात्री चर्चेचा विषय ठरल्या होत्या. यामागचं कारण म्हणजे सुमित्रा महाजन यांचं निधन झालं असल्याची बातमी वेगाने पसरली होती. काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांनी श्रद्धांजली वाहिली आणि सगळीकडे त्यांच्या निधनाची चर्चा सुरु झाली. फक्त शशी थरुरच नाही तर सुप्रिया सुळे यांच्यासहित अनेकांनी ट्विट केलं होतं. तसंच काही प्रसारमाध्यमांनीही वृत्त दिलं होतं. पण नंतर हे वृत्त खोटं असल्याचं लक्षात येताच ट्विट डिलीट करण्यात आले. यामुळे सुमित्रा महाजन चांगल्याच संतापल्या आहेत.
भाजपचे खासदार म्हणाले,
दोन कानाखाली लावीन
रुग्णालयांबाहेर नातेवाईकांकडून होणारा आक्रोश हे चित्र राज्या राज्यांमध्ये दिसत आहे. दरम्यान आपल्या आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या व्यक्तीला भाजपा खासदाराने दोन कानाखाली लगावण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. केंद्रीय मंत्री आणि दामोहचे खासदार प्रल्हाद सिंह पटेल यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये प्रल्हाद सिंह पटेल सरकारी रुग्णालयात दाखल आपल्या आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या व्यक्तीला दोन कानाखाली लगावेन असं बोलताना दिसत आहेत.
विद्यापीठाच्या सर्व
परीक्षा ऑनलाइन होणार
राज्यात कठोर निर्बंधामुळे ऑफलाईन परीक्षा घेणं अशक्य आहे. विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, असं उदय सामंत म्हणाले. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल. प्राध्यापक भरती होणारच नाही, अशा ज्या चर्चा सुरु आहेत त्यावर विश्वास ठेवू नये, असं उदय सामंत म्हणाले.
पोलीस निरीक्षक
सुनील माने यांना अटक
क्राईम ब्रांचचे माजी पोलीस निरीक्षक सुनील माने
मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने ( NIA) सुनील माने यांना बेड्या ठोकल्या. माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 चे माजी पोलीस निरीक्षक आहेत. सध्या त्यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील माने यांची चौकशी करण्यात आली होती.
महाराष्ट्राला फक्त 26 हजार
रेमडेसिव्हीर दिले जाणार
देशातील विविध राज्यांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीरचे आकडे केंद्र सरकारनं नुकतेच जारी केलेत. महाराष्ट्राची गरज दिवसाला 60 हजार इंजेक्शन्सची आहे. राज्य सरकार सातत्याने तशी मागणी करत आहे. केंद्र सरकारने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारला कमी इंजेक्शन्स मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाग्रस्तांची हेळसांड होणार असून त्यातून मृतांचा आकडा वाढण्याचा धोका संभवतो असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी 10 ते 15% रुग्णांना रेमडेसिव्हीरची गरज असते. त्यामुळे राज्याला दर दिवशी 60 हजार रेमडेसिव्हीर मिळणे गरजेचे आहे. याच कारणामुळे राज्य सराकर केंद्र सरकारला पत्र पाठवणार आहे.
रजा मंजूर न केल्याने
कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
सॅनिटायझर पिऊन कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. संचित रजा नामंजूर केल्याचा राग आल्याने कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र कारागृह प्रशासनाला वेळीच हा प्रकार समजल्याने त्याचे प्राण बचावले आहेत. नाशिक कारागृहातील कैदी अविनाश जाधव याने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
‘लाँग कोव्हिड’ म्हणजे काय,
जाणून घ्या याविषयी
बर्याच अभ्यासानुसार, कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी जवळजवळ 50 टक्के असे लोक आहेत, जे यातून रिकव्हर झाल्यानंतरही त्यांना पूर्णपणे बरे वाटत नाही. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण सामान्यत: संसर्ग झाल्यापासून 1 ते 2 आठवड्यांच्या आत बरे होतात. तर, गंभीर लक्षणे (Sever Symptoms) असलेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी 6-7 आठवडे लागतात असे दिसून आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतरही म्हणजेच रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही, जर त्यांना हलका खोकला, डोकेदुखी, शरीरात वेदना, थकवा, श्वास घेण्यात त्रास किंवा चव न लागणे, सुगंध न येणे या समस्या दिसत असतील, तर त्याला ‘लाँग कोव्हिड’ म्हणतात.
ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्यातील
190 कारखान्यांना पत्र
ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवारांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे आवाहन करण्यात आलं आहे.
SD Social Media
9850 60 3590