महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन एअर लिफ्ट करावा लागेल असं म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांनी मांडलेली कल्पना प्रत्यक्षात तेलंगाणामध्ये आली आहे. तेलंगाणा सरकारनं ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्याासाठी भारतीय हवाई दलाच्या मदतीनं ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
तेलंगाणा सरकार विमानाद्वारे ऑक्सिजन आणणार
ऑक्सिजन तुडवड्यावर मार्ग काढण्याासाठी तेलंगाणा सरकारानं हवाई दलाची युद्धामध्ये वापरली जाणारी विमानं वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्सिजन टँकर घेऊन पहिलं विमान तेलंगाणातील बेगमपेट विमानतळावरून भुवनेश्वरला रवाना झाले आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथून ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. विमानांद्वारे 14.5 मेट्रिक टन ऑक्सिजन एअरलिफ्ट करण्यात येईल. यासाठी आठ टँक वापरण्यात येतील.
तेलंगाणा सरकारमधील नगरविकास मंत्री केटीआर यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांनी आरोग्यमंत्री इटाला राजेंद्रकुमार आणि तेलंगाणाचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांचे आभार मानले आहेत. हैदराबाद आणि भुवनेश्वर ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट केल्यानं तीन दिवस वाचतील आणि नागरिकांचे जीव वाचतील, असं केटीआर म्हणाले आहेत.