राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. तर काही ठिकाणी गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातील न्यूज 18 लोकमतने घेतलेला हा आढावा.
जळगावात 9 पर्यटकांना वाचविले. –
जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यातील सुखी धरण 100% भरले आहे. त्यामुळे या धरणातून तापी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. सुखी गारबर्डी धरणाच्या वेस्ट वेअरमध्ये 8 ते 10 पर्यटक पाण्यामध्ये अडकले होते. सदर पर्यटक हे नदीच्या मधोमध उभे होते. तसेच पाण्याचा वेढा त्यांच्या दोन्ही बाजूने पडला होता. जर पाण्याचा प्रवाह अजून वाढला तर सगळे सदर पर्यटक हे वाहून जाण्याची भीती होती. त्या सर्व पर्यटकांना वाचवण्यात यश मिळाले आहे.
बुलडाण्यात अनेक गावांचा संपर्क तुटला –
बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. शेगाव, अकोला या पायदळ दिंडी मार्गावर पावसाने तैमान घातले आहे. तर नागझरी या गावाजवळील मन नदीला महापूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मार्गावरील कलंबा कसुरा, मानारखेड सह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नदीजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गोंदियात नागरिकांच्या घरात शिरले पाणी –
गोंदिया जिल्ह्यात मागील आठ दिवासांपासून मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. याच पावसाचा फटका गोंदिया शहरातील सुर्याटोला परिसरातील तसेच मुख्य रस्त्यावर पाणी, एकता कॉलनीत पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. तर या परिसरातील मुख्य रस्ता पाण्याखाली आहे. यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थाना तसेच वाहनधारकांना या पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. तर वीज वितरणाचे कार्यालय असलेल्या परिसरात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपला रोष नगर प्रशासनाच्या नियोजन शुन्य धोरणावर व्यक्त केला आहे.
तर या पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावर एक युवक जात असताना त्याला कोणत्या ठिकाणी खड्डा आहे हे कळल्याने त्या युवकाचा मोबाईल या पाण्यात पडला. यानंतर त्या युवकाला आपला मोबाईल शोधायला कमालीची कसरत करावी लागली. त्या युवकाला आपला मोबाईल शोधायला बराच वेळ लागला. यानंतर त्याने प्रशासनावर आपला रोषदेखील व्यक्त केला आहे.
हिंगोलीत पुलावरून पुराचे वाहत असल्याने उपचाराअभावी वृद्धाचा मृत्यू
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पिंपरी, खुर्द येथे पुलावर पुराचे पाणी आल्याने उपचाराअभावी एका वृद्ध रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज दुपारी ही घटना घडली आहे. पिंपरी खुर्द या गावाजवळील ओढ्याला संततधार पावसामुळे पूर आला आहे. पुराचे पाणी रोडवरील पुलावरून वाहत आहे. त्यामुळे पिंपरी खुर्द या गावातील आजारी वृद्धाला उपचारासाठी न्यायला उशीर झाला.
पुलावर पुराचे पाणी असल्याने गावकऱ्यांनी अक्षरक्ष: झोळी करून अर्धा किलोमीटर शेतातून चिखल तुडवत या वृद्ध रुग्णाला उपचारासाठी आखाडा बाळापुरकडे नेले. मात्र, उपचाराला उशीर झाल्याने रस्त्यातच संभाजीराव धांडे या 75 वर्षीय रुग्णाचे दुर्दैवी निधन झाले आहे. पुन्हा हा मृतदेहदेखील या गावकऱ्यांना अर्धा किलोमीटर अशाच प्रकारे झोळी करून चिखलातून पायपीट परत गावात आणावा लागला आहे. पिंपरी खुर्द या गावाजवळचा हा पूल कमी उंचीचा असल्याने पाऊस झाला कि लगेच या पुलावर पुराचे पाणी येते. त्यामुळे गावकऱ्यांना नेहमीच अशा संकटांना तोंड द्यावे लागते आहे. हा पूल उंच करण्याची मागणी संतप्त गावकरी करीत आहेत.
गडचिरोलीत वेळीच बचाव पथक पाठवल्याने तरुणाचे वाचले प्राण –
शिवणी नदीला आलेल्या पुराने कुंभी मोकासा गावाला चारी बाजुने वेढल्याने आनंद मेश्राम या रुग्णाला डायलीसीसची आवश्यकता आहे. त्याला रुग्णालयात जात येत नव्हते. त्याला तातडीने डायलिसिस करणे आवश्यक होते. अखेर तहसीलदार गडचिरोली महेंद्र गणवीर यांनी आरोग्य विभागाला संपर्क केल्यानंतर आरोग्य विभागाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधला व सदर रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यासाठी बचाव पथक पाठवण्यात आले.
गडचिरोलीच्या चामोर्शी मार्गावर शिवणी नदीच्या पुराने चामोर्शी मार्ग बंद असल्याने व गुरुवाळा मार्गही नाल्यावरुन पाणी वाहत असल्याने बंद होता. कुंभी मोकासा येथून सदर रुग्णाला पोलीस विभागाच्या MTS च्या बचाव पथकाने तातडीने बोट आणि आवश्यक मनुष्यबळ त्या ठिकाणी पाठवून रुग्णाला सुखरूप बोटीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन उपचार केल्याने रुग्णाचा जीव वाचला.
अकोला – अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसाच्या पाण्याने थैमान घातले आहे. पावसाचे पाणी आणि धरणांमधून पाणी सोडल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक घरांची पडझड आणि नुकसान झाले. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे.
चंद्रपूर – चिमूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे उमा नदीला पूर आला आहे. या उमा नदीच्या पुरामुळे पुढच्या भागातील पूल पाण्याखाली गेले आहेत. तसेच मूल-चामोर्शी मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक मार्ग पुराच्या पाण्याने बंद असताना हा मार्ग बंद झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात जाणारा आणखी एक मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त लावून दोन्ही बाजूला वाहनधारकांना वाहतुकीस मनाई केली आहे.
वर्धा – वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळा बंद ठेवण्याबाबत शाळा समिती निर्णय घेणार आहे. तसेच पूरस्थिती व पावसाचा अंदाज घेऊन शाळा बंद ठेवण्याबाबत ठरवावं लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे.
यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नद्यांची पातळी वाढली आहे. त्यात शेतामध्ये काम करण्यासाठी दोघे गेले होते. मात्र, अचानक बेंबळा नदीची पाणी पातळी वाढल्याने या दोघांनीही जीव वाचविण्यासाठी एका झाडाचा सहारा घ्यावा लागला आहे. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला आणि याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच बचावकार्य सुरू झाले. दरम्यान, हे दोन जण अडकल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.