महाराष्ट्रातला शिवसेनेमध्ये सुरू असलेला संघर्ष आता दिल्लीमध्येही पोहोचला आहे. शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार बंड करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. या 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत. दिल्लीमध्ये पोहोचताच शिंदे या खासदारांसोबत बैठक घेणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या या बैठकीला कृपाल तुमाने, राहुल शेवाळे, धैर्यशील माने, हेमंत गोडसे यांच्यासह आणखी खासदार या बैठकीला उपस्थित राहतील. मंगळवारी सकाळी खासदारांचा हा गट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खासदारांना लॉटरी
शिवसेनेच्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात या गटाला एक केंद्रीय मंत्री आणि एक राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेचा सावध पवित्रा
एकीकडे दिल्लीमध्ये शिवसेना खासदार बंड करण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण लागल्यानंतर शिवसेनेचे खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटायला गेले, याचसोबत त्यांनी पत्रही दिलं आहे. आमचे गटनेते विनायक राऊत आहेत, तसंच मूळ शिवसेना आमचीच आहे, हे या पत्रात सांगण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्षांना हे पत्र देण्यासाठी विनायक राऊत, राजन विचारे, बंडू जाधव, अनिल देसाई आणि अरविंद सावंत गेले होते.
ते खासदार कोण?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाच्या बैठकीला शिवसेनेचे 12 खासदार ऑनलाईन उपस्थित होते. यामध्ये सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, धैर्यशील माने, कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांचा समावेश होता.