पारनेरच्या तहसिलदार ज्योती दवरे यांनी स्थानिक आमदार निलेश लंकेंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप केला. यानंतर त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. आधी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल देत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आता आमदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवर अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यानंतर अण्णा हजारे यांनीही असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नको म्हणत वेळ पडल्यास थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचं मत व्यक्त केलं. त्यामुळे एकूणच सुसाईड नोट म्हणून ऑडिओ क्लिप जारी करणाऱ्या पारनेरच्या तहसिलदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.
आमदार निलेश लंके यांनी शनिवारी अण्णा हजारे यांची भेट घेऊन पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपच्या अनुषंगाने चर्चा केली. तसेच तहसीलदारांवरील आरोपांचीही माहिती देताना आपली बाजू मांडली. यानंतर अण्णा हजारे यांनी योग्य त्या कारवाईसाठी मुख्यमंत्री ठाकरेंशी बोलणार असल्याचं सांगितलं.
निलेश लंके यांनी अण्णा हजारे यांना तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरोधात जेष्ठ नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर झालेली चौकशी, त्यात तहसीलदार देवरे यांच्यावर ठेवण्यात आलेला ठपका, या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी त्यांना रात्री-अपरात्री पाठवलेले मेसेज, यापूर्वी इतर तालुक्यात तहसीलदार म्हणून काम करताना देवरे यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याबाबतच माहिती दिली.
लंके यांनी दिलेल्या माहितीनंतर अण्णा हजारे यांनी “असे अधिकारी तालुक्यात नकोत, वेळ पडली तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन”, असं मत व्यक्त केलं. त्यामुळे अण्णा हजारे यांनी आमदार निलेश लंके यांना क्लिन चिट दिल्याची जोरदार चर्चा आहे.
तहसीलदार देवरे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सादर केलेल्या अहवालात अनेक घोटाळे उघड झाल्याचं बोललं जातंय. देवरे यांनी अनेक कामांमध्ये हस्तक्षेप करून हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. याशिवाय वाळू साठ्यातही गैरव्यवहार करून शासनाचे मोठं नुकसान केल्याचा आरोप आहे. जमीन प्रकरणात गैरव्यवहार करणे, शरतील कोविड सेंटर, हॉस्पिटल विरोधात चौकशी करून कागदपत्रे सादर न करणे, शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता न ठेवणे आणि आपली कामाची जबाबदारी नीटपणे पार न पाडणे, कामात हयगय करणे आणि वरिष्ठांच्या आदेशाचा भंग करणे असे अनेक गंभीर आरोप तहसीलदार देवरे यांच्यावर करण्यात आलेत.
(फोटो गुगल)