“माझ्याकडून बोलण्याच्या ओघात चूक झाली”, ‘त्या’ विधानावर अजित पवारांनी मागितली माफी
महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार काल पुणे दौऱ्यावर होते. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला. त्यांनी बोलण्याच्या ओघात सावित्रीबाई फुलेऐवजी सावित्रीबाई होळकर असं म्हटलं. संबंधित कार्यक्रमातला व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला. तसेच अजित पवारांनी माफी मागावी, अशी मागणी केली.या सर्व घडामोडीनंतर शनिवारी अजित पवारांनी आपल्या चुकीसाठी माफी मागितली आहे. आपल्याकडून बोलण्याच्या ओघात ती चूक झाली, असं व्हायला नको होतं, असं अजित पवारांनी म्हटलं. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दिलगीरी व्यक्त केली.
“अरे तू काय इथे कोर्ट मार्शल करायला बसलाय का?” भर पत्रकार परिषदेत संजय राऊत पत्रकारावर भडकले
संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे सरकारवर सडकून टीका केली. राज्यातील सरकार गेंड्याच्या कातडीचं असून रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण पुढे येत असताना हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं बसून आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी ते एका पत्रकारावर भडकल्याचेही बघायला मिळालं. “शिवसेनेने बाहेरून आलेल्या लोकांना पदं दिलीत, त्यामुळे निष्ठावंत मागे राहतात, असं तुम्हाला वाटतं का?” असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, “अरे तू काय इथे कोर्ट मार्शल करायला बसलाय का?” असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं.
योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन पाच लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ४ आणि ५ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी विविध उद्योजकांची भेट घेतली. तसेच या उद्योजकांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली. महत्त्वाचे याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी डावोसला जाणार असल्याची माहिती पुढे आली. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे.
महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या, बंगळुरूमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात!
२६ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाने महिलेवर लघुशंका केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी बंगळुरूमधून अटक केली आहे. शंकर मिश्रा असे या व्यक्तींचं नाव आहे. तसेच त्याला आज बंगळुरूमधून दिल्लीत आणण्यात येणार आहे.‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणी दिल्ली पोलीस आरोपीचा शोध घेत होते. त्यासाठी पथकंदेखील तयार करण्यात होती. या पथकांद्वारे आरोपीच्या मुंबईतील घरी छापा टाकण्यात आला. मात्र, घराला कुलूप होते. दरम्यान, शंकर मिश्रा बंगळुरूमध्ये त्याच्या नातेवाईकाकडे लपून बसला असल्याची माहिती दिली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज ( शनिवारी) बंगळुरूतील त्याच्या नातेवाईकाच्या घरातून आरोपीला ताब्यात घेतले.
रशिया-युक्रेनदरम्यान शांतीसाठी भारताची भूमिका महत्त्वाची – अमेरिका
रशियाच्या युक्रेमधील आमक्रमनाबाबत आम्ही भारतासह अनेक देशांशी संपर्कात असून रशिया-युक्रेन दरम्यान शांती प्रस्तापित करण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची आहे, असं विधान अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते नेस प्राईस यांनी केले आहे. तसेच आजचे युग हे युद्धाचे नाही, या पंतप्रधान मोदींच्या मताशीही अमेरिका सहमत असल्याचे ते म्हणाले. वॉशिंगटनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महिलेला फरपटत नेत मंदिराबाहेर काढलं; पुजाऱ्यासह मंदिरातील कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
महिलेने पुजाऱ्याच्या अंगावार थुंकल्याचा आरोप करत तिला फरपटत मंदिराबाहेर नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंगळुरूमधील वेंकटेश मंदिरात ही घटना घडली. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी महिलेल्या तक्रारीनंतर मंदिराच्या पुजाऱ्यासह कर्माचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
‘भारत जोडो’ यात्रेच्या यशासाठी काश्मीर प्रशासनच अधिक दक्ष
‘भारत जोडो’ यात्रेच्या अंतिम टप्प्यासाठी, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने पूर्वतयारी केली असून सुरक्षेच्या दृष्टीने तिथल्या प्रशासनाशीही संवाद साधण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यात ही यात्रा यशस्वी होणे काँग्रेससाठी महत्त्वाचे असले तरी, येथील यात्रेचा प्रवास निर्विघ्न होणे केंद्र सरकार व भाजपसाठी देखील राजकीय लाभाचे असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे यात्रेच्या यशासाठी काश्मीर प्रशासनाच अधिक दक्ष असल्यााचे दिसत आहे.
मानवनिर्मित, नैसर्गिक घटकांमुळे जोशीमठ संकटात; तज्ज्ञांचे मत
मानवनिर्मित आणि नैसर्गिक अशा विविध घटकांमुळे जोशीमठमध्ये भूस्खलन होत आहे, असे वाडिया इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीचे संचालक कलाचंद सैन यांनी सांगितले. हे घटक अलीकडे निर्माण झालेले नाहीत तर ते दीर्घावधीपासून तयार होत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तीन प्रमुख घटकांमुळे जोशीमठचा पाया असुरक्षित आहे. एका शतकापूर्वी भूकंपामुळे उद्भवलेल्या भूस्खलनाच्या ढिगाऱ्यावर हे गाव विकसित करण्यात आले. तसेच अतिभूकंपप्रवण असलेल्या झोन पाचमध्ये त्याचा समावेश होतो. याशिवाय हवामानाचा परिणाम आणि पाण्याच्या झिरपण्यामुळे जमिनीची घटणारी एकसंधताही भूस्खलनास कारणीभूत असल्याचे सैन यांनी सांगितले. बांधकामांचा अतिरेक, वाढत्या लोकसंख्येचा दाब आणि वारंवार उद्भवणाऱ्या हवामानाशी संबंधित घटनांमुळे जोशीमठ गावातील जमीन अनेक ठिकाणी हळूहळू खचत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. हा अलीकडचा प्रश्न नाही. सरकारी समितीने १९७६च्या आपल्या अहवालात खचणाऱ्या घरांच्या समस्येवर प्रकाश टाकला होता. घराला तडे गेल्याच्या तक्रारींनंतर या सरकारी समितीच्या सदस्यांनी तेथे भेट देऊन अहवाल तयार केला होता.
हिराबा स्मृती सरोवर: गुजरातमधील बंधाऱ्यास नरेंद्र मोदींच्या आईचं नाव
गुजरातमधील राजकोट येथे बांधण्यात येत असलेल्या एका छोट्या धरणाला (बंधारा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. हा बंधारा ‘गिर गंगा परिवार ट्रस्ट’च्या उभारण्यात येत आहे. राजकोट-कलावाड मार्गावरील वागुदाद गावाजवळील न्यारी नदीवर हा बंधारा बांधण्यात येत असून यासाठी १५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
कर्णधाराच्या निर्णयामुळे द्विशतकाचं स्वप्न भंगलं, जगातील असा तिसरा फलंदाज
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने चौथ्या दिवशी डाव घोषित केला. यामुळे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला द्विशतक पूर्ण करता आलं नाही. डाव घोषित केल्यानं द्विशतक पूर्ण करता न आलेला तो जगातील तिसरा फलंदाज ठऱला आहे. याआधी सचिन तेंडुलकरला डाव घोषित केल्यानं द्विशतक करता आलं नव्हतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीडनी कसोटीत चौथ्या कसोटीत उस्मान ख्वाजा १९५ धावांवर खेळत असताना पॅट कमिन्सने डाव घोषित केला.पावसामुळे सीडनी कसोटीचा तिसरा दिवस वाया गेला होता. एकही चेंडू न टाकला गेल्यानं चौथ्या दिवशी अशी परिस्थिती होती की पॅट कमिन्सने संघाच्या हितासाठी निर्णय घेत डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४ बाद ४७५ धावा केल्या.
ऋषभ पंतवर मुंबईतील रुग्णालयात तीन तास सुरु होती शस्त्रक्रिया
भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत त्याच्या कार अपघातानंतर आता विविध आव्हानांशी मोठी झुंज देत आहे. पंतवर सध्या मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु असून आज तब्बल तीन तास त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर पंतच्या तब्बेती विषयी अपडेट येत असून या शस्त्रक्रियेनंतर पंत उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे.सूत्रांच्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर ही शस्त्रक्रिया झाली असून पंतची ही शस्त्रक्रिया डॉ दिनशॉ पादरीवाला यांनी केली आहे. अपघातानंतर ऋषभ पंतवर देहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु पायावरील शस्त्रक्रियेसाठी बीसीसीआयने शुक्रवारी पंतला एअरलिफ्ट करून मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात हलवले. आज झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पंतला ३ ते ४ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेनंतर पंत उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती आहे.
सानिया मिर्झाचा मोठा निर्णय ; टेनिसमधून निवृत्तीची घोषणा
भारतीय मुलींच्या मनात टेनिस या खेळाबद्दल आवड आणि प्रेरणा निर्माण करण्याचं श्रेय सानिया मिर्झाला जातं. हैदराबाद येथील सानियानं, महेश भूपती आणि लिएंडर पेस या पुरुष सहकाऱ्यांसह भारतीय टेनिसला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. भारताच्या या टेनिससुंदरीनं आता खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. वुमेन टेनिस असोसिएशन (डब्ल्यूटीए) वेबसाइटशी बोलताना सानियानं सांगितलं की, फेब्रुवारी (2023) महिन्यामध्ये दुबईत होणारी डब्ल्यूटीए 1000 स्पर्धा ही तिची शेवटची टेनिस स्पर्धा असेल. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
जागतिक क्रमवारीतील माजी अग्रमानांकित दुहेरी खेळाडू असलेल्या सानियाला 2022 च्या अखेरीस निवृत्त व्हायचं होतं. पण, कोपराच्या दुखापतीमुळे ती यूएस ओपनचा भाग होऊ शकली नाही. म्हणून तीनं निवृत्तीचा विचार टाळला. मिश्र आणि महिला दुहेरीत सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेती सानिया या महिन्याच्या (जानेवारी) शेवटी ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. ही तिची शेवटची मोठी स्पर्धा असेल. यानंतर ती दुबईत आपल्या कारकिर्दीचा शेवट करण्यासाठी कोर्टमध्ये उतरेल.
तिसऱ्या टी २० सामन्यात कोणाचं पारडं राहणार जड?
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या टी 20 मालिकेत आज निर्णायक सामना पारपडणार आहे. शनिवारी 7 जानेवारी रोजी राजकोट येथे मालिकेतील तिसरा सामना आयोजित केला गेला असून हा सामना जिंकणारा संघ मालिका विजयासाठी पात्र ठरेल. भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. तर गुरुवारी पुण्यात झालेला दुसरा सामना श्रीलंकेने जिंकून मालिकेत भारताशी 1-1 अशी बरोबरी साधली. आज होणाऱ्या तिसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेपेक्षा भारताचं पारडं अधिक जड राहण्याची शक्यता आहे. मात्र श्रीलंकेचा संघ दुसऱ्या सामन्याप्रमाणेच भारतीय संघावर प्रभारी ठरला तर मात्र हे पारडं श्रीलंकेच्या बाजूने झुकण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’ चा ठरणार आहे.
SD Social Media
9850 60 3590