टी-20 मालिकेत भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिल्यानंतर उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यामधील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला. हा सामना अनिर्णित राखण्यात किवी संघाला यश आलं आहे. आज सामन्याच्या शेवटच्या आणि निर्णायक दिवशी उभय संघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. अवघ्या एका विकेटमुळे भारताच्या हातचा घास किवी संघाने हिरावला.
काल चौथ्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर 284 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधीही परदेशी संघाने भारतीय भूमीवर एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला नव्हता. न्यूझीलंडलादेखील ते शक्य झाले नाही. मात्र त्यांनी आपला संघ ऑल आऊट होऊ दिला नाही. न्यूझीलंडने आज दिवसअखेर 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली. परिणामी हा सामना अनिर्णित राहिला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 345 धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडला पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी 296 धावांत रोखले. त्यानंतर भारताने दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर 284 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या न्यूझीलंडने 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना वाचवण्यासाठी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी खूप मेहनत घेतली. प्रामुख्याने न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी चांगली झुंज दिली. रचिन रवींद्र आणि एजाज पटेल या दोघांनी 9 वी विकेट गेल्यानंतर पुढचे 52 चेंडू खेळून काढले. 52 चेंडूत 10 धावांची नाबाद भागीदारी रचत या दोघांनी सामना वाचवला. अखेर अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.
कालच्या 1 बाद 4 धावांवरुन पुढे सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आजच्या दिवसातलं पहिलं सत्र गाजवलं. सामन्याच्या पाचव्या दिवसातील पहिल्या सत्रात न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी सामना त्यांच्या बाजूने झुकवला. त्यांनी पहिल्या सत्रात भारताला कोणत्याही प्रकारचं यश मिळू दिलं नाही. टॉम लॅथम (35 – पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत) आणि विल सोमरविले (36) या दोघांनी 76 धावांची नाबाद भागीदारी रचली होती. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी चांगलंच पुनरागमन केलं. या दोन सत्रांमध्ये भारतीय गोलंदाजांनी 8 बळी घेतले.