अनाथ मुलांसाठी ‘आशीर्वाद’ योजना नव्याने लागू

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या लाटेत मृतांचे प्रमाण अधिक आहे. या लाटेत काही बालकांचे आई-वडील मारण पावले. तर काही कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले. याच कारणामुळे कोरोना महामारीमुळे ज्या बालकांचे पालक मरण पावले आहेत, त्यांच्या भविष्याची काळजी घेण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. तसेच ओडिशा सरकारनेसुद्धा अनाथ मुलांसाठी ‘आशीर्वाद’ योजना नव्याने लागू केली आहे.

ओडिशा राज्यात 2020 पासून लागू असलेल्या आशीर्वाद योजनेत लाभार्त्याचे तीन श्रेणींमध्ये गट पाडलेले आहेत.

पहिला गट : जी मुलं अनाथ आहेत.

दुसरा गट : ज्या मुलांना बालगृहात जावं लागलेलं आहे.

तिसरा गट : अशी मुलं ज्यांच्या आई-वडिलांपैकी कमावत्या व्यक्तीचे निधन झाले आहे.

या योजनेंतर्गत ज्या मुलांचे आई-वडील किंवा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. अशा मुलांना सरकार प्रतिमहिना 2,500 रुपये देणार आहे. या मुलांना जे लोक सांभाळतात, त्यांच्या खात्यात ही रक्कम ट्रान्सफर केली जाईल. यामध्ये जी मुलं बालगृहात आहेत त्यांना अतिकिरक्त 1000 रुपये दिले जातील. अनाथ मुलं 18 वर्षांची होईपर्यंत हे पैसे दिले जातील.

मुलाच्या आई-वडिलांपैकी कमावणाऱ्या एकाचा मृत्यू झाला तर मुलाला 1,500 रुपये दिले जातील. अनाथ मुलांची आई जर ओडिशा सरकारने सुरु केलेल्या मधु बाबू पेंशन योजनेस पात्र असेल तर त्या आईचा या योजनेसाठी प्राधान्याने विचार केला जाणार आहे.

जी बालकं अनाथ झाली आहेत किंवा बालगृहात राहातात त्यांच्या आरोग्याची जबाबदारी ओडिशा सरकार घेणार आहे. केंद्र सरकारप्रमाणेच ओडिशा सरकारसुद्धा आरोग्य कल्याण योजनेंतर्गत अशा बालकांना निशुल्क आरोग्य सेवेची सुविधा पुरवणार आहे. विशेष म्हणजे ओडिशा सरकाकडून या विद्यार्थ्यांच्या शाळेचा खर्चही उचलला जाणार आहे.

अनाथ मुलांची ज्या व्यक्ती देखभाल करतील. त्या सर्वांना पक्के घर बांधून देण्याचेही ओडिशा सरकारने घोषित केले आहे. असे असले तरी ज्या बालकांना कोणीतरी दत्तक घेतले आहे त्यांना ‘आशीर्वाद’ योजना लागू होणार नाही, असेही सरकारने सांगितले आहे.

या योजनेचा शुभारंभ केल्यांतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या योजनेंतर्गत बाल संरक्षण विभाग, मंडळ आणि पंचायत स्तरावरील समिती, चाईल्डलाईन, फ्रन्ट वर्कर म्हणून काम करणारे कर्मचारी यांना एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहाता कामा नये, असे निर्देश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.