आज दि.३० एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

तर न्यायव्यवस्था कधीही शासकीय
कारभाराच्या आड येणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या संयुक्त परिषदेच्या उद्घाटन सत्राला हजेरी लावली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एनव्ही रमण यांनीही यात सहभाग घेतला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले की, “आपण ‘लक्ष्मण रेषा’ लक्षात ठेवायला हवी. जर ते कायद्यानुसार असेल तर न्यायव्यवस्था कधीही शासकीय कारभाराच्या आड येणार नाही. जर नगरपालिका, ग्रामपंचायतींनी त्यांचे कर्तव्य बजावले, पोलिसांनी योग्य तपास केला आणि बेकायदेशीर कोठडीचा छळ संपला, तर लोकांना कोर्टात जाण्याची गरज भासणार नाही.”

पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा
देणं बंद करावं : लष्कर प्रमुख नरवणे

भारत आणि पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी घोषित करून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं की, “सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं कुणाच्याही हिताचं नाही. भारत पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवण्यास उत्सुक आहे. पण पाकिस्ताननं आधी दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करावं. तसेच जम्मू-काश्मीर प्रश्नाकडे आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू नये”.

स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू
‘आयएनएस विक्रांत’ नौदलाच्या सेवेत

स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ ही भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे. आत्तापर्यंत झालेल्या विविध चाचण्या या यशस्वी झाल्या आहेत, विक्रांतवरील सर्व उपकरणांनी समाधानकारक काम केले आहे. आता लवकरच विक्रांत शेवटच्या चाचण्यांकरता कोचिन बंदरातून रवाना होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यावर मे महिन्यात विक्रांत नौदलाकडे सुपूर्द केली जाणार आहे. कोचिन शिपयार्डकडून विक्रांतची बांधणी करण्यात आली आहे.

लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू
लष्कराचे नवे उपप्रमुख

लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांची लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १ मे रोजी ते कार्यभार स्वीकारतील. सध्याचे लष्कराचे उपप्रमुख असलेल्या लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची लष्करप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आल्याने राजू यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या बी. एस. राजू हे लष्करी मोहिमांचे महासंचालक आहेत. विजापूर येथील सैनिकी शाळेत आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये लष्करी प्रशिक्षण घेतलेले लेफ्ट. ज. राजू हे निष्णात हेलिकॉप्टर पायलट आहेत. १५ डिसेंबर १९८४ रोजी त्यांनी जाट रेजिमेंटमधून आपल्या लष्करी कारकीर्दीला सुरुवात केली. ३८ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा चीनमध्ये
शिक्षणासाठी येण्याबाबत परवानगी

गेल्या दोन वर्षाहून अधिक काळापासून भारतासह संपूर्ण जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं आहे. करोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वच क्षेत्रांवर वाईट परिणाम झाला आहे. शिक्षण क्षेत्रही याला अपवाद राहिलं नाही. करोनाकाळात विदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड झाली आहे. करोना निर्बंधामुळे मायदेशी परतलेले हजारो विद्यार्थी अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. अशात चीननं भारतीय विद्यार्थ्यांना परत बोलवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलायला सुरुवात केली आहे. काही भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा चीनमध्ये शिक्षणासाठी येण्याबाबत परवानगी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

तर फक्त मशिदींवरचे भोंगे बंद
होणार नाहीत : अजित पवार

सांगलीमध्ये झालेल्या सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत इशारा दिला आहे. “उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला म्हणे. घेतला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाने सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत लाऊड स्पीकरला परवानगी दिली आहे. डॉ. आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, दिवाळीचे असे १५ दिवस आहेत. यातले ३ दिवस वेळ वाढवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी आहे. उद्या जर कुठला निर्णय घ्यायचं झालं, तर फक्त मशिदींवरचे भोंगे बंद होणार नाहीत”, असं अजित पवार म्हणाले.

जुन्या व्हिडीओ भरून राज ठाकरे
यांच्यावर रविकांत वर्पे यांची टीका

राज ठाकरे शंभूराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला निघालेत. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत दुसऱ्यांचे व्हिडीओ लावणाऱ्यांना आपण भूतकाळात काय बोललोय याची मात्र जाणीव नाही. नतमस्तक व्हायला चाललाच आहात तर आता महाराजांच्या चरणी नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी तेवढी मागा”, असं ट्वीट या व्हिडीओसोबत रविकांत वरपे यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रविकांत वरपे यांनी राज ठाकरें यांच्यावर टीका करतानाच त्यांचा एक जुना व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

मुख्यमंत्री पिंजऱ्यात बसून डरकाळ्या
फोडतात : सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत म्हणाले, “मुख्यमंत्री हे कर्तबगार असल्यामुळे जनता या महामारीशी या जनतेला वेळेत उपचार मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हते आणि हे मात्र पिंजऱ्यात बसून डरकाळ्या फोडत होते. मला वाटतं की जसं तुम लढो हम कपडे संभालते है…तसं कार्यकर्त्यांना सांगायचं की तुम्ही लढा, स्वत:वर गुन्हे दाखल करून घ्या आणि मी मात्र ऐश्वर्यामध्ये सत्ता उपभोगण्याचं काम करतो. केवळ मी एकटाच नाही तर माझ्या घरादारासकट मंत्री मंडळात घेऊन, आम्ही तुपाशी आणि तुम्हा उपाशी अशी त्यांची कृती आहे.”

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.