आज दि. २९ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

पंजाबमध्ये शिवसेनेच्या खलिस्तानविरोधी
मोर्चात राडा; तुफान दगडफेक

पंजाबमधील पतियाला येथे आज दुपारच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान संघर्ष झाला. शिवसेनेनं खलिस्तानी गटांविरोधात काढलेल्या मोर्चादरम्यान हा सारा गोंधळ घडला. पंजाबमधील शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष हशिष सिंघेला यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चावर दगडफेक करण्यात आली. या संघर्षामध्ये तलावारीही उपसण्यात आल्याने वातावरणामध्ये तणाव निर्माण झालेला. काही शीख गटांच्या लोकांचा शिवसैनिकांसोबत या मोर्चादरम्यान वाद झाला.

कोळसा पुरवण्यासाठी रेल्वेने वाढवली
माल वाहतूक, रद्द केल्या ६७० पॅसेंजर ट्रेन

विजेच्या मागणीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे कोळशाची वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. पण याचा परिणाम आता प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्यांवर होत आहे. गेल्या काही आठवड्यांत दररोज सुमारे १६ मेल/एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. देशभरातील वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळसा वाहतूक करण्यासाठी एकाच मार्गावर ज्यादा गाड्या चालवाव्या लागत आहेत. रेल्वे मंत्रालयाने २४ मे पर्यंत पॅसेंजर गाड्यांच्या जवळपास ६७० फेऱ्या रद्द करण्याची अधिसूचना दिली आहे. यामध्ये ५०० हून अधिक फेऱ्या लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या आहेत.

पुन्हा एकदा सचिन पायलट
यांची आक्रमक भूमिका

दोन वर्षांपूर्वी सचिन पायलट यांनी राजस्थानमधील नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करत केलेली बंंडखोरी सर्वश्रुत आहेच. मात्र, त्यानंतर त्यांचा राग निवळला आणि ते पक्षातच राहिले. पण यादरम्यान सचिन पायलट यांची पक्षानं राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी केली. शिवाय राज्याच्या अध्यक्षपदावरून देखील त्यांना पायउतार व्हावं लागलं. यानंतर आता पुन्हा एकदा सचिन पायलट यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. एनडीटीव्हीनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

नांदेडमध्येही तलवारी सापडल्या

महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा कट रचला जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला कारणही तसंच आहे. काल धुळ्यात पोलिसांनी मोठ्याप्रमाणात तलवारी जप्त केल्या होत्या. तर आज नांदेडमध्येही पोलिसांना तलवारी सापडल्या आहेत. नांदेडमध्ये एका ऑटोतून 25 तलवारी नेल्या जात होत्या. शिवाजीनगर गुन्हे शोध पथकानं संशयावरून तपासणी केली असता या तलवारी आढळून आल्यात. गोकुळनगर भागात ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलंय.

एसी लोकलच्या तिकीटाचे
दर हे ५० टक्क्यांनी कमी

भायखळा इथे झालेल्या रेल्वेच्या एका कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री राबसाहेब दानवे यांनी एसी लोकलच्या तिकीटाचे दर हे ५० टक्क्यांनी कमी करत असल्याचं जाहीर केलं. यामुळे सीएसएसटी ते ठाणे या ३४ किलोमीटरच्या एसी लोकलमधील प्रवासाला एका तिकीटासाठी १३० रुपये मोजावे लागायचे तिथे आता ९० रुपये आकारले जाणार आहे. तर चर्चेगेट ते वसई रोड या ५२ किलोमीटरच्या प्रवासाला २१० रुपये द्यावे लागायचे तिथे आता १०५ रुपये द्यावे लागणार आहेत.

मनसेच्या महाआरतीला विश्व हिंदू
परिषद, बजरंग दलाचा पाठिंबा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पुण्यातील सर्व मंदिरात तीन तारखेला महाआरती करण्यात येणार असून त्यामध्ये मनसैनिकांसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल त्यांच्यासह संलग्न असलेल्या सात ते आठ संघटना सहभागी होणार आहे. यासंदर्भातील माहिती मनसेचे नेते अजय शिंदे यांनी दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या सभेत मशिदीवरील भोंग्यांबाबत भूमिका जाहीर केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली.

१००० वर्षांनंतर ३० एप्रिल
२०२२ रोजी प्लॅनेट परेड

३० एप्रिल २०२२ हा दिवस ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टीने खूप खास असणार आहे. या दिवशी सूर्यग्रहण असून एकाच रांगेत चार ग्रह दिसणार आहेत. याप्रमाणे ग्रहांच्या रेषेत येण्याचा हा अद्भुत योगायोग सुमारे १००० वर्षांनंतर घडला आहे, असं म्हटलं जातंय. ग्रह एका रेषेत येण्याला प्लॅनेट परेड म्हणतात. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात शुक्र, मंगळ, गुरू आणि शनि यासह चार ग्रह एकापाठोपाठ येण्यास सुरुवात झाली असून ३० एप्रिल रोजी ते सूर्योदयाच्या १ तास आधी पूर्व दिशेला एका सरळ रेषेत एकत्र दिसतील. यापूर्वी विलक्षण नजारा इ.स. ९४७ मध्ये पाहायला मिळाला होता.

4-G नंतर स्वतःचे 5-G असेल तर
6-Gच्या बाबतीत भारत आघाडीवर

भारताने इंटरनेटचा स्पीड वाढवण्याबाबत कमाल केली आहे. यामुळे जगाला हादरा बसला आहे. वास्तविक, भारताने स्वतःचे 4-G बनवले आहे. त्याची किंमत खूप कमी आहे, तर गुणवत्ता खूप जास्त आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की 4-G नंतर भारताचे स्वतःचे 5-G असेल. तर 6-Gच्या बाबतीत भारत आघाडीवर असेल. भारताचे दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, देशातील एक लाख 2-जी टॉवर्स 4-जीमध्ये रुपांतरित केले जातील. पुढील वर्षअखेरीस हे काम पूर्ण होईल

कर्नाटकमधील PSI भरती घोटाळा
भाजपाच्या पदाधिकाऱ्याला अटक

अलीकडेच कर्नाटकात देखील पीएसआय भरती घोटाळा उघड झाला आहे. या घोटाळ्यात आता भारतीय जनता पार्टीचं कनेक्शन समोर आलं आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी भारतीय जनता पार्टीच्या एका महिला नेत्याला अटक केली आहे.
संबंधित महिला नेत्या मागील काही दिवसांपासून पुण्यात लपून बसल्या होत्या. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून सीआयडीच्या पथकानं त्यांना पुण्यातून अटक केली आहे. दिव्या हागरगी असं अटक केलेल्या महिला नेत्याचं नाव आहे. त्या कर्नाटकातील कलबुर्गी येथील भाजपाच्या महिला युनिटच्या अध्यक्षा होत्या. पण हा घोटाळा उघडकीस येताच भारतीय जनता पार्टीने त्यांच्यापासून अंतर राखलं आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.