अंधेरी पोटनिवडणुकीत चालणार वंचित फॅक्टर? प्रकाश आंबेडकरांनी दिली उद्धव ठाकरेंना टाळी!

मुंबईतील अंधेरी पूर्व भागामध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे. या निवडणुकीसाठी भाजप सोडून जो पक्ष आम्हाला पाठिंबा मागेल त्यांना आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली.

पिंपरीमध्ये धम्म प्रवर्तन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते पत्रकारांशी प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी थेट भाजपविरोधात भूमिका मांडली.’राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता जो पक्ष आमच्या बरोबर यायला तयार आहेत, त्यांच्या बरोबर आम्ही जायला तयार आहोत. पण भाजप सोडून सर्व पक्षासाठी आमचे दरवाजे खुले असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांना जर खरंच पापक्षालन करायचं असेल तर त्यांनी जाहिरपणे मनू स्मृतीचं दहन करावं तसं केल्यास आम्ही सदैव तुमच्यासोबत राहू, असं आवाहनच प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. ऋतुजा लटके यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे, तर मुरजी पटेल यांना शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पाठिंबा आहे.

महाविकासआघाडी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीने ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला असला, तरी ठाकरेंनी या मतदारसंघातून डमी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. ऋतुजा लटके यांच्यासह संदीप नाईक यांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संदीप नाईक हे युवासेनेचे पदाधिकारी आहेत, तसंच ते शिवसेनेचे अंधेरीमधले माजी नगरसेवकही होते. ऋतुजा लटके यांच्या अर्जाच्या तपासणीवेळी काही अडचण आली तर संदीप नाईक अर्ज मागे घेतील, असं अनिल परब यांनी सांगितलं आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना दोन अर्ज भरले आहे. एकूण 25 उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. पण मुख्य लढत ही शिवसेना उद्धव गट आणि भाजपमध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.