स्मृती मंधानाचा षटकार अन् लंका’हरण’; भारतीय महिलांनी जिंकला आशिया चषक
बांगलादेशातील सिल्हेट येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाने विजयी षटकार खेचत भारताने आशिया चषक जिंकला. तब्बल आठ गडी राखून श्रीलंकेचा दारूण पराभव केला. स्मृतीने २५ चेंडूत ५० धावांची खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवले. रेणुका सिंगने ३ षटकात ३ गडी बाद केले तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर अष्टपैलू कामगिरीसाठी दीप्ती शर्माला मालिकाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
…आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचले ‘वर्षा’ बंगल्यावर
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी काळात काहीतरी मोठं घडणार आहे हे निश्चित आहे. राज्याच्या राजकारणात तीन महिन्यांपूर्वी मोठा भूकंप घडला होता. त्यानंतरही राजकीय घडामोडी या सुरुच आहेत. कारण मनसे नेत्यांकडून गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर काही प्रमाणात टीकेची झोड उठवली जात असताना आज वेगळंच घडलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी थेट त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. सुरुवातीला आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी या दोन बड्या नेत्यांची भेट होत असल्याची माहिती समोर येत होती. नंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याचं मानलं जात होतं. पण या भेटीचे वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. काही जणांनी ही त्यांची वैयक्तिक कारणासाठी भेट असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या भेटीदरम्यान पडद्यामागे नेमकं काय-काय घडत असेल याचे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.
‘वर्षा’वर हालचालींना वेग, राज ठाकरेंनंतर काँग्रेसचे तीन बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती ताजी असतानाच आता वर्षा बंगल्यावरील आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काँग्रेसचे तीन बडे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यामध्ये राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि अमिन पटेल यांचा समावेश आहे. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जावून भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमागे नेमकं कारण काय याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण शाळेच्या पटसंख्ये संदर्भात सुरु असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याची चर्चा आहे. किंवा तीनही काँग्रेस नेते हे आपापल्या मतदारसंघाच्या विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर चर्चा करण्यासाठी आल्याची शक्यता आहे.
पक्षाचं सर्व लक्ष मुंबईत? बावनकुळेंच्या नागपूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पंचायत समिती पैकी 9 जागेवर काँग्रेसचा सभापती, 3 जागेवर राष्ट्रवादीचा सभापती तर एका जागेवर शिंदे गटाचा सभापती निवडणूक आला आहे. धक्कादायक म्हणजे पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपची पाटी कोरीच राहिली आहे.
त्यामुळे आता उद्याच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, पारशिवानी, उमरेड, मौदा, कुही व भिवापूर, मौदा या पंचयातीत विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीनेने नरखेड, काटोल व हिंगणा येथे सत्ता स्थापन केली आहे. दुसरीकडे शिंदे गटाला रामटेक पंचायत समितीची सत्ता मिळाली आहे.
बॉईज 3 च्या दणदणीत यशानंतर आता बॉक्स ऑफिसवर बॉईज 4 घालणार राडा
मराठी चित्रपटसृष्टीत 2017 आणि 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बॉईज’ ‘बॉईज २’ ला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले होते. त्यानंतर बॉईज ३ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. एकीकडे बॉलिवूडचे मोठे चित्रपट यश मिळण्यासाठी धडपडत असताना या मराठी चित्रपटाला प्रेक्षकानी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटातील धैर्य, ढुंग्या आणि कबीर यांचे त्रिकूट आणि त्यांच्या आयुष्यात येणारी कानडी मुलगी यांची धमाल मस्ती पडद्यावर पाहायला मिळाली. नुकतेच या चित्रपटाचे यश साजरे करण्यात आले. त्यात चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे.आता लवकरच ‘बॉईज 4’ ही आपल्या भेटीला येणार आहे. यात ही धमाल आणखी चौपट होणार आहे.
हे खेळाडू ठरू शकतात टी-20 वर्ल्ड कपमध्ये ‘एक्स फॅक्टर’, सुरेश रैनाचं भाकित
ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ICC टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 टीम सहभागी होत आहेत. टूर्नानेंटसाठी भारतीय टीम सज्ज झाली आहे. टीममधील ऑल राउंडर खेळाडू हार्दिक पंड्या व ऋषभ पंत या टूर्नानेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील असं एका माजी खेळाडूला वाटतंय. ऑल राउंडर रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे टीमबाहेर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात उत्तम कामगिरी करणारा पंत आणि पंड्या हे दोघे भारतीय टीममधील ‘एक्स फॅक्टर’ असतील, असं सुरेश रैनाला वाटतंय. विशेष म्हणजे, एकेकाळी युवराज आणि रैनाने माजी कॅप्टन एमएस धोनीसोबत मिळून जशी कामगिरी केली होतील, तशीच कामगिरी पुन्हा हे दोघं आताच्या कॅप्टनसोबत करू शकतात, अशी शक्यताही रैनाने वर्तवली आहे.
निवडणुकीत जिंकण्यासाठी मांडली अघोरी पूजा, पालघरमधील घटना
मतदारांना आकर्षित करून ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्यासाठी अंधश्रद्धेतून अघोरी विद्या आणि जादूटोणा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पालघर मध्ये समोर आला आहे.पालघर मधील वाडा तालुक्यातील खरीवली बिलावली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पौलबारे येथील जंगलात ही अघोरी विद्या सुरू असताना गावातील काही तरुणांनी मांत्रिक आणि 10 जणांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. निवडणुकीत अघोरी विद्या करून विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला इजा करण्याच्या उद्देशाने अंधश्रद्धेतून हा सर्व प्रकार सुरू असल्याचे उघड झालं आहे.
याच गावातील स्मशानभूमीत हा प्रकार सुरू असलेल्या ठिकाणाहून वाडा पोलिसांनी काळी बाहुली, अगरबत्ती, लिंबू, अबीर गुलाल, काळा दोरा आणि स्कुटीसह एक इको कार ताब्यात घेतली आहे. या प्रकरणात वाडा पोलिसांनी दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून नोटीस बजावली आहे. वाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
10 हजारांची लाच मागितली, तरुणाने RTO अधिकाऱ्याला कपडेच दिले काढून
आरटीओ कार्यालयामध्ये भ्रष्टाचार किती प्रमाणामध्ये फोफावलेला आहे, याबद्दलचा सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात एका व्हिडीओची चांगलाच व्हायरल झाला आहे. गाडी पासिंगसाठी लाच मागितल्या नंतर सामाजिक कार्यकर्त्याने चक्क आपले कपडेच काढून अधिकाऱ्याला देत गांधीगिरी केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.त्याचं झालं असं की, वाहन पासिंग करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे या तरुणाकडे दहा हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाच मागितल्या नंतर चक्क आपली कपडे काढून देत कडेगावमधील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांनी हे अनोखे आंदोलन केले आहे.
भाजपचा नेता लवकरच शिवबंधनात, संजय राठोडांना देणार शह?
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. पण, दुसरीकडे आता शिवसेना यवतमाळमध्ये भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपचे नेते आणि माजी आमदार संजय देशमुख शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री आणि भाजपचे नेते तथा दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. येत्या 20 ऑक्टोबरला देशमुख हे शिवबंधन बांधणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थिती प्रवेश करणार आहे. यवतमाळमध्ये शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांनी शिवसेनेत बंड पुकारून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले.
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ला सोनिया गांधींचीही साथ, पण प्रियंका गांधी नेमक्या कुठे?
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देश पिंजून काढताना दिसत आहेत. ते देशभरातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या यात्रेतून ते पक्षालादेखील नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला दक्षिण भारतात उत्सफुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा प्रतिसाद पाहता राहुल गांधी यांच्या आई, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या देखील या यात्रेत सहभागी झाल्या. सोनिया गांधी या गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात बरेच दिवस उपचार सुरु आहेत. या दरम्यान त्यांच्या पाठीमागे ईडीचा ससेमिरा लागलेला होता. त्यामुळे सोनिया गांधी या दुहेरी संकटात सापडलेल्या बघायला मिळाल्या. पण या सगळ्या संकटांना सामोरं जात सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी राहुल गांधी यांनी सोनिया यांना पायी न चालता गाडीत बसून यात्रेत सहभागी होण्याची विनंती केली होती. यावेळी त्यांनी सोनिया यांच्या बुटाची लेसही बांधल्याचं दृश्य बघायला मिळालं होतं. अतिशय भावनिक हा सगळा प्रसंग होता. संबंधित प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर संबंधित प्रसंगाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळाला. या दरम्यान एक प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय. राहुल आणि सोनिया भारत जोडो यात्रेत व्यग्र असताना काँग्रेस नेत्या आणि राहुल यांच्या बहीण प्रियंका गांधी कुठे आहेत? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय.
SD Social Media
9850 60 3590