दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या प्रत्येक चित्रपटातून त्यांचा एक व्यक्ती म्हणून विशेष ठसा उमटला आहे. ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ यांसारख्या दमदार मराठी चित्रपटांनंतर त्यांनी ‘झुंड’च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांच्या पहिल्यावहिल्या हिंदी चित्रपटाची प्रचंड उत्सुकता तर होतीच. शिवाय आमिर खान, धनुष यांसारख्या मोठ्या कलाकारांच्या तोंडून ‘झुंड’चं कौतुक ऐकल्यानंतर चित्रपटाची ‘माऊथ पब्लिसिटी’ जोमाने सुरू झाली. प्रदर्शनाच्या दिवशीच या चित्रपटावरून सोशल मीडियावर दोन गट पडले. एका गटाने नागराज यांच्या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला. तर दुसऱ्या गटाने चित्रपटाला सोडून दुसऱ्या विषयांवरून त्यावर टीका करण्यास सुरुवात केली. सोशल मीडिया आणि त्यावरील ट्रोलिंगवर आता खुद्द नागराज मंजुळेंनीच उत्तर दिलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते चित्रपटावरील ट्रोलिंगविषयी व्यक्त झाले.
सोशल मीडियावरील टीकांना मी गांभीर्यानं घेत नाही. कारण सोशल मीडियाला डोकं नसतं, चेहरा नसतो. ते मला एका मशीनसारखं वाटतं. माझ्या चित्रपटाबद्दल खरंच काही तक्रार असेल तर त्यांनी माझ्यासमोर येऊन बोलावं. चित्रपटात काही चुका असतील आणि तुम्ही त्या मला प्रत्यक्षात येऊन सांगितलं तर मी माझे मुद्दे मांडू शकेन. मला जे काही सांगायचं होतं ते मी चित्रपटातून सांगितलं आहे. त्याला आता वेगळी पुरवणी जोडायची काय गरज आहे? शेवटी एकमेकांना समजून उमजूनच पुढे जावं लागणार”, असं मत नागराज यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडलं.
नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. या कल्पनेत कितीही विरोधाभास असला तरी त्यांनी हा प्रयोग सत्यात उतरवला आहे. छाया कदम, किशोर कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार, कलाकारांच्या नजरेतले भाव अचूक टिपणारी सुधाकर रेड्डी यांची सिनेमॅटोग्राफी आणि अजय-अतुल या जोडगोळीच्या संगीताची योग्य जोड या चित्रपटाला मिळाली आहे.