पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या क्षणी कसबा मतदारसंघ अखेरीस काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीतून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कसबा पोटनिवडणूक कोण लढवणार यावरून अखेर पडदा बाजूला झाला आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसला कसबाची जागा सोडण्यात आली आहे. रवींद्र हेमराज धंगेकर यांच्या नावाची घोषणा दिल्ली हायकमांडकडून करण्यात आली आहे. सोमवारीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे जिल्ह्यातील कसबा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत.
कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा नाना पटोले यांनी केली होती. त्यामुळे कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे उमेदवार हेमंत रासने लढत पाहण्यास मिळणार आहे.
चिंचवडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार
दरम्यान, मंगळवारी अर्ज दाखल करत असतानाच उमेदवाराची घोषणा होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसंच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला संपर्क केला, तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपल्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.
अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध झाली असली तरी पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाही, याची आठवण अजित पवार यांनी करून दिली. चिंचवडची पोटनिवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढवली जाईल, डांगे चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून राष्ट्रवादीचा उमेदवार अर्ज दाखल करेल, असं अजित पवार यांनी सांगितलं.