मराठा आरक्षणावर संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून, त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारला इशारा दिलाय. तर दुसरीकडे त्यांनी मराठा आरक्षणासाठी भाजपनं दिलेली खासदारकी सोडण्यास तयार असल्याचं बोलून दाखवलंय. त्यावरूनच आता भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी संभाजीराजे छत्रपती यांना सबुरीचा सल्ला दिलाय.
योग्य व्यक्तींना भेटल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटेल
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजीनामा देऊ नये, योग्य व्यक्तींना भेटल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटेल, असंही नारायण राणे म्हणालेत. खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याच्या चर्चेवर भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी संभाजी राजेंना सबुरीचा सल्ला दिलाय.
तुम्ही राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार नाही. तुम्ही जी मोहीम हातात घेतलीय, ती भाजपात राहूनचं केल्यास लवकर आरक्षण मिळेल. त्यामुळे राजीनामा न देता योग्य व्यक्तींना भेटलात, ज्यांच्यात आरक्षण देण्याची क्षमता आहे, तर प्रश्न सुटू शकतो. मात्र तुम्ही राजीनामा देऊ नये, अशी विनंती असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय.
विशेष म्हणजे 7 जूनपर्यंत जर सरकारनं मी सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही, तर आम्ही कोविड वगैरे काही बघणार नाही, असा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दिलाय. 6 जूनपर्यंत मी अल्टिमेटम देत आहे. त्यानंतर रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा निर्धारही संभाजीराजे छत्रपतींनी बोलून दाखवलाय. सकल मराठा समाजाच्या वतीनं मी बोलतोय. कुठल्याही राजकीय पक्षाचा अजेंडा घेऊन आलेलो नाही. सकल मराठा समाजाला न्याय मिळायला हवा. छत्रपतींचा वंशज म्हणून सांगू इच्छितो की, जो महाराष्ट्र मी 2007 पासून पिंजून काढतोय, मराठा समाजावर जो अन्याय आज होतोय, त्याविरोधात हा लढा आहे, असंही त्यांनी सांगितलंय.