पत्नीशी झालेल्या वादातून पतीने दीड वर्षीय मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्या धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनेश पुंडलिक वानखडे (26)असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कुंदेगाव आहे. या ठिकाणी दिनेश पुंडलिक वानखडे हे राहतात. दिनेश वानख़डे यांचे काल पत्नीशी जोरदार भांडण झाले. यानंतर दिनेश हा दीड वर्षाच्या चिमुकला रोशनला घेऊन कुंदेगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाजवळ आला. त्यानंतर त्याने एका ओढणीच्या मदतीने रोशनला गळफास दिला. त्यानंतर स्वत: दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. पती-पत्नीच्या वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांचे मृतदेह खाली उतरवले. या प्रकरणी मृताचा भाऊ राजेश वानखडे याने तामगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन याप्रकरणी अकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. मात्र वडील आणि अवघा दीड वर्षाचा मुलगा झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्यानतंर सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.