मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाडवा मेळावा 22 मार्चला गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्याचा टीझर मनसेने जारी केला आहे. मनसेच्या या टीझरमध्ये राज ठाकरे मराठी आणि हिंदुत्वाबाबत बोलत आहेत. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यामध्ये सगळं बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता, त्यानंतर आता मनसेकडून हा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. मनसेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
काय आहे टिझरमध्ये?
या व्हिडिओच्या सुरूवातीलाच हिंदू ही दोन अक्षरं जगा, मराठी या तीन अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा. राज ठाकरे ही पाच अक्षर नेहमीच पाठीशी असतील, असं लिहिण्यात आलं आहे. यानंतर राज ठाकरेंचं भाषण या व्हिडिओमध्ये लावण्यात आलंय. ‘माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन, माझ्या धर्माला कुणी नख लावायचा प्रयत्न केला, तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन,’ असं राज ठाकरे म्हणत आहेत. ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.
22 मार्चला संध्याकाळी 6 वाजता शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची गुढी पाडवा मेळाव्यानिमित्त जाहीर सभा होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही महिन्यांमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. त्यातच सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातली सुनावणीही संपली आहे, ज्याचा निकाल कधीही येऊ शकतो, त्यामुळे राज ठाकरे या संपूर्ण राजकारणाबाबत कोणती भूमिका घेणार आणि खास त्यांच्या शैलीत कोणावर घणाघात करणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.