सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये दिशा सालियान प्रकरण चर्चेत आलं आणि त्यावरून ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाले. आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिंदे, फडणवीस सरकार सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची देखील एसआयटी चौकशी लावण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. आता संजय राऊत यांच्या या टीकेला उत्तर देताना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार पलटवार केला आहे.
शंभूराज देसाईंचा राऊतांना टोला
शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी हवेत तिर मारू नये, संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने पहात नाहीत. पत्राचाळीच्या व्यवहारात साडेतीन महिने तुम्ही जेलमध्ये होतात. आताही तुम्ही फक्त जामिनावर बाहेर आहात. या प्रकरणाचा निकाल अजून लागलेला नाही असा टोला शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
आदित्य ठाकरे कायदेशीर उत्तर देणार?
दरम्यान दुसरीकडे आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आपल्यावरील आरोपांना कायदेशीर उत्तर देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आदित्य ठाकेर आरोप करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता आहे.