संसदीय समितीतून आऊट झालेल्या गडकरींचा भाजपला घरचा आहेर, जाहीररित्या सांगितली सरकारची सर्वात मोठी समस्या
आपल्या विकासकामांमुळे नेहमी चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या मोठी चर्चा सुरू आहे. संसदीय समिती आणि निवडणूक समितीमधून नितीन गडकरी यांचं नाव वगळण्यात आल्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली होती. नितीन गडकरी यांचं नाव वगळून देवेंद्र यांचा समावेश निवडणूक समितीमध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान आज नितीन गडकरी यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. देशातील विकासकामांच्या दिरंगाईवर बोलताना त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. गडकरी म्हणाले की, प्रोजेक्ट आखले जातात, पण ते वेळेत पूर्ण कसे होतील, याकडे लक्ष द्यायला हवं. सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, असं यावेळी नितीन गडकरी म्हणाले. आज असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सने आयोजित केलेल्या ‘NATCON 2022’ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते.
लाखोंचा जनसागर, सिनेअभिनेता गोविंदा थिरकला, अमरावतीत राणा दाम्पत्याकडून भव्य कार्यक्रमाचं आयोजन
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा यांनी आज अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रक्ततुलाचा आणि दहीहंडीचा एकत्रित कार्यक्रम आयोजित केला होता. अतिशय भव्य असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सिनेअभिनेता गोविंदा यानेदेखील हजेरी लावली होती. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढच्या निवडणुकीत भाजपचाच आमदार-खासदार निवडून येईल, अशी घोषणी केली. तर फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली आणि राणा दाम्पत्याच्या कामांचं कौतुक केलं. त्यानंतर अभिनेता गोविंदाने दोन मिनिटाचं भाषण करत उपस्थितांचं मनोरंजन केलं. यावेळी गोविदाने डान्सदेखील केला. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित तरुणाई देखील थिरकली.
शर्मिला ठाकरेंचं मोठं वक्तव्य, राज-उद्धव दोन्ही भाऊ एक होणार, ठाकरे कुटुंब एकत्र येणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात चर्चेचा प्रश्न म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र कधी येतील? राज ठाकरे यांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यापासून राज्यभरातील जनतेची ठाकरे बंधुंनी एकत्र यावं, अशी भावना आहे. विशेषत: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर लाखो शिवसैनिक आणि मनसैनिकांची अशी भावना आहे. उद्धव आणि राज हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर फायदाच होईल, असं विधान शर्मिला ठाकरे यांनी केलं. त्यांची साद आली तर पाहू. पण त्यांची साद आधी येऊ द्या, असं देखील शर्मिला ठाकरे म्हणाल्या. शर्मिला ठाकरे यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करुन ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्रित करण्याचा प्रयत्न केलाय, असं म्हणायला वावगं ठरणार नाही. पण त्यावर आता उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
शुभमन गिलचं प्रमोशन, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत गिल टीम इंडियाचा कॅप्टन
सध्या सुरु असलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विंडीजविरुद्धची वन डे मालिका गाजवल्यानंतर झिम्बाब्वेतही भारताच्या मालिकाविजयात त्यानं मोलाचं योगदान दिलंय. त्यामुळे बीसीसीआयनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी भारत अ आणि न्यूझीलंड अ संघांमध्ये होणाऱ्या मालिकेत शुभमन गिलकडे भारताचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे 22 वर्षांचा गिल भारत अ संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
धार्मिक स्थळी आलेले पाचजण तलावात उतरले अन्.. नांदेडमध्ये दोन कुटुंबावर दुःखाचा डोंगर
कंधार तालुक्यात सर्वांच्या मनाला चटका लावून जाणारी दुर्दैवी घटना आज दुपारी घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील जगतुंग तलावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने लोक फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. काही धार्मिक स्थळी जातायेत तर काही पर्यटनस्थळी गर्दी करत आहेत. अशावेळी काळजी न घेतल्याने अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागत आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे.
‘महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचं फिरणं मुश्किल करु’, सरकारला मोठा इशारा
“सरकार म्हणून तुम्ही ऊसतोड कामगारांचे प्रश्न गांभीर्याने घ्या. ऊसतोड कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्षी जैसे थे आहेत. सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जातोय. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या फायद्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या, ऊसतोड कामगार महामंडळाची तात्काळ अंमलबजावणी करा. अन्यथा येणाऱ्या काळात सरकारमधील मंत्र्यांचं फिरणं मुश्किल करू”, असा इशारा ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून सरकारला दिला.
समन्स पाठवूनही रणवीर सिंह उद्या पोलीस ठाण्यात राहणार नाही हजर
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह गेल्या काही दिवसांपासून आपल्या चित्रपटांमुळे नाही तर न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या फोटोशूटनंतर रणवीरविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी रणवीरला समन्स पाठवून 22 ऑगस्ट, सोमवारी हजर होण्यासाठी सांगितलं होतं. पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी रणवीरने 2 आठवड्यांची मुदत मागितली आहे.
‘महाराष्ट्रात काळू-बाळूचा तमाशा सुरू, तर शहाजी बापू…’, विनायक राऊतांची बोचरी टीका
शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी आज सांगोल्यामध्ये शिवसेनेचा निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सध्या महाराष्ट्रामध्ये काळू बाळू यांचा तमाशा सुरू आहे, असा टोला राऊत यांनी हाणला. तर शहाजी बापू पाटील सोंगाड्या आहेत, अशी उपमाही विनायक राऊत यांनी दिली.
‘सध्या महाराष्ट्रामध्ये काळू-बाळूचा तमाशा सुरू आहे. एक दाढीवाला आहे, तर एक बिनदाढीवाला आहे. बिनदाढीवाल्याच्या मनात आलं की खेचलं मागे, मग दाढीवाला पडला. राष्ट्रगीतासाठी कसं उभं राहावं, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा,’ असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलं.
राणा दाम्पत्य लवकरच भाजपमध्ये! शिंदेंकडे गेलेल्या अडसुळांना धक्का
अमरावतीचा पुढचा खासदार हा भाजपचा असेल, तर बडनेराचा आमदारही भाजपचाच राहील अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अमरावतीमधल्या राणा दाम्पत्यांच्या दहीहंडी कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
‘कोरोना’नंतरचा गणेशोत्सव, मुंबईतल्या मंडळांना पाळाव्या लागणार या अटी, BMC कडून नियमावली जाहीर
गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे मुंबई महापालिकेने मंडळांसाठीची नियमावली जाहीर केली आहे. गणेशमूर्तींच्या उंचीबाबतचे निर्बंध हटल्यानंतर तसंच कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतरचा हा पहिलाच निर्बंधमुक्त गणेशोत्सव आहे. पालिकेची कोरोना काळापूर्वीची जुनीच नियमावली यंदाच्या गणेशोत्सवात लागू असणार आहे. गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध नसले तरी मंडप मात्र 30 फूट उंचीपर्यंतचेच असावेत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
25 फुटांपेक्षा उंच मंडप असेल तर मंडप बांधणीचा अहवाल पालिकेला सादर करणं गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक असेल. मंडप बांधणीमुळे गणेशोत्सवानंतर खड्डा आढळल्यास प्रती खड्डा दोन हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. सार्वजिनक गणेशोत्सव मंडळात प्रतिबंध केलेल्या जाहिराती लावणाऱ्या मंडळांवर पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे.
टोमॅटो फिवरचा सर्वात जास्त धोका कोणाला?
जगात सध्या कोरोना आणि मंकीपॉक्सचं थैमान सुरू आहे. मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत असताना आता नवीन आजाराने थैमान घातलं आहे. टोमॅटो फीवरने आता जगाचं टेन्शन वाढवलं आहे. HFMD असं या आजाराला म्हणतात किंवा टोमॅटो फीवर असंही म्हटलं जातं. या आजाराने जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे.
टोमॅटो व्हायरस वेगानं लहान मुलांमध्ये वेगानं पसरत आहे. ६ मे २०२२ मध्ये केरळमध्ये पहिल्यांदा टोमॅटो फीवरचा पहिला रुग्ण सापडला होता. आतापर्यंत ८२ जणांना या आजाराचे लक्षण आढळून आले आहेत. हा आजार एक ते पाच वर्षांपर्यंच्या मुलांमध्ये अधिक वेगानं पसरत आहे. ज्या मुलांची इम्युनिटी कमी आहे त्यांना या आजाराचा धोका जास्त असल्याचं सांगण्यात आलं आहे.
देशात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणेकडून या शहरांना इशारा
देशात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत असल्याचा महत्त्वपूर्ण इशारा देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी जारी केला आहे. यानंतर चंदीगडचे सेक्टर 43 बस स्टँड पोलीस सीआरपीएफ क्विक रिअॕक्शन टीमसह तपास करत आहेत.कोणत्याही प्रकारे संशय आल्यास त्या व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे.अलर्टनुसार चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशतवादी हल्ला करू शकतात. दहशतवादी बस स्टँडला लक्ष्य करू शकतात, अशी शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणेच्या अलर्टनंतर पंजाब पोलीस आणि सुरक्षा दल सतर्क झाले आहेत.
SD Social Media
9850 60 3590