भारतात UPI मुळे ऑनलाईन व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. लोक रोखीने व्यवहार करण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहारावर भर देतात. मात्र अलीकडेच अशी बातमी आली होती की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वर काही चार्जेस लावण्याचा विचार करत आहे. मात्र या चर्चांवर आता केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. अर्थ मंत्रालयाने दिलासा देणारी माहिती दिली आहे. मंत्रालयाने सांगितले की सरकार UPI पेमेंट सेवेवर कोणतेही शुल्क आकारण्याचा विचार करत नाही.
अर्थ मंत्रालयाने ट्विट केले की, UPI हा असाच एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जो लोकांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे आणि अर्थव्यवस्थेत त्याचे मोठे योगदान आहे. UPI पेमेंट सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारण्याचा विचार नाही. सर्व्हिस प्रोव्हायडर खर्चाच्या वसुलीसाठी इतर पर्यायांचा विचार केला जाईल.
UPI म्हणजे काय?
UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. विशेष म्हणजे तुम्ही UPI द्वारे पैसे कधीही, रात्री किंवा दिवसा ट्रान्सफर करू शकता.
पैसे ट्रान्सफरची UPI सिस्टम कशी कार्य करते?
UPI सुविधा वापरण्यास अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएम, फोनपे, गुगल पे, भीम इत्यादी कोणतेही UPI अॕप डाउनलोड करावे लागेल. तुम्ही तुमचे बँक खाते UPI अॕपशी लिंक करून ही सिस्टम वापरू शकता. UPI द्वारे, तुम्ही एक बँक खाते एकाधिक UPI अॕप्सशी लिंक करू शकता. त्याच वेळी, एका UPI अॕपद्वारे अनेक बँक खाती ऑपरेट केली जाऊ शकतात.