राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच जेलमध्ये जाणार असं ट्वीट करून भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी खळबळ उडवून दिली होती. पण, मोहित कंबोज यांनीच 52 कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.मोहित कंबोज यांनी ट्वीट करून राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याबद्दल भाकीत वर्तवलं होतं. यावर बोलत असताना रोहित पवार यांनी मोहित कंबोज यांच्यावर आरोपस्त्र सोडले आहे.
मोहित कंबोज यांच्या ट्वीटला फारसे महत्त्व देण्याचं काम नाही, मोहित कंबोज यांनी स्वतः ओव्हरसिज बँकेतील 52 कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता, आता त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी केला.
सुप्रीम कोर्टातील निर्णय पुढे ढकलून चालणार नाही. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी होणार होती. सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकांवरील निकाल पुढे ढकलून चालणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकशाहीला आणि संविधानाला धरून निर्णय असला पाहिजे, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली.
सोलापुरातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे, पण, जे लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये सुरुवातीपासून होती, त्यांना काहीही मिळालं नाही मात्र उशिरा गेलेल्यांना मंत्रिपदं मिळाली. जास्त भरती केल्याने लोक गुदमरत आहेत, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.
‘दिल्लीचे आम आदमी पार्टीच्या मनीष सिसोदिया यांच्यावर होत असलेल्या कारवाईचा रोहित पवार यांनी निषेध केला. त्यांना उगाच बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय असंही ते म्हणाले.