गंभीर आजार दूर किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी, तसंच चांगल्या आरोग्यासाठी रोज फळं खावीत, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ नेहमीच देत असतात. आपल्याकडे काही फळं हंगामी, तर काही फळं बारमाही उपलब्ध होतात. प्रत्येक फळात शरीरासाठी उपयुक्त अशी पोषक तत्त्वं असतात. त्यामुळे लहान मुलं आणि वृद्धांनी तर रोज किमान एखादं फळ खावं, असं सांगितलं जातं. सध्या बाजारात लिचीची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. देशभरात लिची हे फळ आवडीनं खाल्लं जातं. लिचीमध्ये मुबलक पोषक तत्त्वं असतात. सर्वसामान्यपणे लिची खाल्ल्यानंतर फळांची सालं कचऱ्यात टाकून दिली जातात; मात्र असं करणं चुकीचं आहे. कारण लिचीच्या सालांमध्येदेखील पोषक तत्त्वं असतात. त्यामुळे लिचीची सालं आरोग्यासाठी हितावह मानली जातात.
बिहारमधल्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात लिचीचं सर्वाधिक उत्पादन होतं. सध्या बाजारात लिची मुबलक उपलब्ध होत आहे. लिचीमध्ये व्हिटॅमिन सी, फॉलेट, नायसिन, रायबोफ्लेविन, बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरासाठी लिची पोषक मानली जाते. लिची खाल्ल्यानंतर लिचीची सालं फेकून देऊ नयेत. कारण ती सालंसुद्धा आरोग्यासाठी उपयुक्त असतात, असं तज्ज्ञ सांगतात. पायाच्या घोट्यावरची घाण स्वच्छ करण्यासाठी लिचीची साल खूप उपयुक्त आहे. ही साल बारीक वाटून घ्यावी आणि त्यात मुलतानी माती, सफरचंद सायडर व्हिनेगर आणि खाण्याचा सोडा मिक्स करावा. हे मिश्रण घोट्यावर 20 मिनिटं लावून, त्यानंतर पाण्यानं धुऊन टाकावं, याविषयीची माहिती देणारं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने प्रसिद्ध केलं आहे.
लिचीच्या सालीचा वापर फेस स्क्रब म्हणूनही करता येतो. मिक्सरमध्ये लिचीची सालं, तांदळाचं पीठ, कोरफड जेल आणि गुलाब पाणी एकत्र बारीक करून घ्यावं. या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करावा आणि नंतर चेहरा धुऊन टाकावा. यामुळे चेहरा चमकदार होईल. लिचीच्या सालीने मानेवरचे डागही कमी होऊ शकतात. यासाठी साल बारीक करून त्यात लिंबाचा रस, खोबरेल तेल आणि हळद मिसळून पेस्ट तयार करावी. यामुळे मानेवरच्या मृत पेशी निघून जातील.
लिची सेवनाचे शरीराला अनेक फायदे होतात. लिची खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहतं. गर्भवती महिलांसाठी हे फळ खूपच उपयुक्त आहे. लिचीमुळे घशातली खवखव दूर होते. वजन कमी करण्यासाठी लिची खाणं फायदेशीर ठरतं. तसंच यामुळे पचनक्रियादेखील चांगली राहते. लिव्हरशी संबंधित विकार दूर ठेवण्यासाठी लिची खाणं उपयुक्त आहे. तसंच या फळात अॅंटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात.