छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्य़ातील जंगलात शनिवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलातील बावीस जवान शहीद झाले, तर अन्य १२ जण जखमी झाले. या चकमकीत एक महिला नक्षलवादीही ठार आहे.
बस्तरच्या दक्षिणेकडील जंगल हा नक्षलवाद्यांचा मोठा अड्डा आहे. विजापूरपासून ते सुकमा जिल्ह्य़ापर्यंत शुक्रवारी रात्री नक्षलविरोधी कारवाई करण्यात येत होती, असे राज्याचे उपमहानिरीक्षक (नक्षलविरोधी कारवाई) ओ. पी. पाल यांनी सांगितले. शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गस्ती पथक आणि पीएलजीएच्या नक्षलवाद्यांमध्ये जोनागुडा गावात चकमक सुरू झाली, ती जवळपास तीन तास सुरू होती, असे पाल म्हणाले. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या चकमकीत बावीस जवान शहीद झाले असून अन्य १२ जण जखमी झाले आहेत. या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली आहे.
सुरक्षा दलांचे संयुक्त पथक सुकमा आणि विजापूर सीमेवरील तारेम परिसरात नक्षलविरोधी कारवाई करीत असताना ही चकमक उडाली. या संयुक्त पथकामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकातील जवान, जिल्हा राखीव दलाचे आणि विशेष कृती दलाचे असे दोन हजारांहून अधिक कर्मचारी होते.