प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाल्याने हाहाकार

वसई-विरार शहरात मोठ्या प्रमाणावर प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. खासगी रुग्णालयात प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाल्याने हाहाकार उडाला होता. त्यामुळे पालिकेने इतर ठिकाणांहून प्राणवायू मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. वसई आणि पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र आहे. या ठिकाणी प्राणवायू लागत असतो. रुग्णांना लागणारा प्राणवायू औद्योगिक क्षेत्राकडे वळवला जात असल्याची शक्यता पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी व्यक्त केली आहे. उद्योगांना लागणारा प्राणवायू रोखण्यासाठी प्रयत्ना केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वसईत गॅलेक्सी आणि स्पीड या दोन प्राणवायू रिफिलिंग करणाऱ्या कंपन्या आहेत. वैद्यकीय परवान्यावर प्राणवायू पुरवला जात असतो. मात्र वैद्यकीय परवान्यावर दिला जाणारा प्राणवायू हा औद्योगिक कंपन्यांना पुरवला जात असल्याचा आरोप रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केला आहे. आम्ही वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयांना प्राणवायू पुरवतो. परंतु परवान्यावर इतर ठिकाणी प्राणवायू नेला जातो की नाही, याबाबत निश्चित सांगता येणार नाही, असे स्पीड कंपनीचे संचालक प्रसाद राऊत यांनी दिली. शहरात प्राणवायूची कमतरता असून दुसरीकडे कृत्रिम प्राणवायूची टंचाई होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अन्य ठिकाणी प्राणवायू जाऊ नये याची खबरदारी घेत आहेत.

प्राणवायूची कमतरता रोखण्यासाठी वसई-विरार महापालिकेने अतिरिक्त प्राणवायू आणण्यासाठी प्रयत्ना सुरू केले आहेत. रायगड येथून प्राणवायू शहरात आणता यावा यासाठी पालिकेने टँकर घेतला असल्याची माहिती उपायुक्त किशोर गवस यांनी दिली. सोमवारी पालिकेकडे ५ टन प्राणवायू आला तर मंगळवारी देखील १० टन प्राणवायू आणल्याची माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी दिली. यामुळे पालिकेकडे ३ दिवस पुरेल एवढा प्राणवायू शिल्लक असल्याची माहिती डॉ. वाळके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.