सरकारने बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवसांसाठी राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत संचारबंदी लागू करत असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि अर्थसाह्य़ देण्यात येईल अशी माहिती दिली.
अन्न सुरक्षा योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. यावरुन अतुल भातखळकर यांनी निशाणा साधत एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा? अशी विचारणा केली आहे. मुख्यमंत्री महोदय बोलताना थोडा विचार केलात तर बरं होईल असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
अतुल भातळखर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी. त्यातील अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी 7 कोटी? एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा? मुख्यमंत्री महोदय बोलताना थोडा विचार आणि बोलण्यापूर्वी थोडा अभ्यास केलात तर बरं होईल”. दरम्यान राज्यात गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमाणे सर्व व्यवहार या काळात बंद राहणार नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पेट्रोलपंप, सार्वजनिक वाहतूक, रिक्षा-टॅक्सी, उपनगरीय रेल्वे, आरोग्य सेवा सुरू राहणार असल्या तरी सबळ कारणांशिवाय कोणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही वा खासगी वाहने रस्त्यावर आणता येणार नाहीत. या काळात अत्यावश्यक सेवा-उद्योग आणि त्याच्याशी निगडित सेवा सुरू राहतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.