मराठी न शिकवणाऱ्या शाळांना
दंड भरावा लागणार
चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना पहिलीपासून विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ज्या शाळा या नियमांची अंमल बजावणी करणार नाहीत अशा शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा शाळाकडून एक लाख रुपये दंड वसूल करावा असे निर्देश शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले आहेत.
राज्यातील प्रत्येक शाळेत 2020-21 पासून मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे.
अमेरिकेमध्ये मोठा राजकीय
भूकंप होण्याचे संकेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यामधील संबंध कमालीचे ताणले गेले असून अमेरिकेमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत देणारं वृत्त समोर येत आहे. अमेरिकेच्या राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार बायडेन हे नवीन उपराष्ट्रपती निवडण्याची आणि कमला यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी सोपवण्याची तयारी करत आहेत. सीएनएनने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार वेस्ट विंगच्या प्रमुख कर्मचाऱ्यांनी उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांचं पालन करणं बंद केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पुरेसा वेळ उपलब्ध नसणे हे यामागील मुख्य कारण सांगितंल जात आहे.
परमबीर सिंग फरार घोषित,न्यायालयाचा मोठा निर्णय
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यासंदर्भात न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. मात्र आता न्यायालयाने परमबीर सिंगांना फरार घोषित केलं आहे. परमबीर सिंग यांना फरार घोषित करायचं कि नाही, यावर सुनावणी सुरू होती.
अखेर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. गुन्हे शाखेतर्फे परमबीर सिंग यांना फरार आरोपी घोषित करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती.
परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांनी वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले होते. यामध्ये देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. तर, परमबीर सिंग सध्या गायब आहेत. ते कोर्टातही हजर नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांना समन्स बजावण्यात आलं. मात्र काहीही प्रत्युत्तर न आल्याने त्यांच्याविरोधात वॉरन्ट जारी करण्यात आलं आहे.
कुलभूषण जाधव यांना दाद मागता येणार, पाकिस्तानी संसदेत विधेयक मंजूर
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात बंद असलेले कुलभूषण जाधव यांना निकालाविरोधात दाद मागण्याचा अधिकार मिळाला आहे. या संदर्भात पाकिस्तानी संसदेत एक विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या निर्णयानुसार हे विधेयक मंजूर झाले आहे.
अवकाशात चांद्रयानची
टक्कर टळली
चंद्राभोवती फिरणाऱ्या नासाच्या आणि इस्त्रोच्या या उपग्रहांची टक्कर ही २० ऑक्टोबरला भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ११ वाजुन १५ मिनीटांनी होणार होती. यावेळी या दोन्ही उपग्रहांच्या कक्षेमध्ये १०० मीटरपेक्षा कमी अंतर असणार होते. या उपग्रहांचा आकार आणि सोलर पॅनेलचा विस्तार बघता ही टक्कर अटळ होती. अर्थात नासा आणि इस्त्रो या अवकाश संस्थांना हा संभाव्य धोका काही दिवस आधीच लक्षात आला. दोन्ही संस्थांनी चर्चा केल्यावर इस्त्रोने चांद्रयान २ ची कक्षा बदलण्याचा निर्णय घेतला. संभाव्य टक्कर होण्याच्या दोन दिवस आधीच इस्त्रोने चांद्रयान २ च्या कक्षेत बदल केला आणि चंद्राच्या भोवती उपग्रहांची होणारी टक्कर ही टाळण्यात आली.
शरद पवार यांच्या अमरावती
दौऱ्याला भाजपचा विरोध
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भाजपचे अनिल बोंडे यांनी विनंती वजा इशारा दिला आहे की, शरद पवार यांनी अमरावतीत पाय ठेवू नये. शरद पवार हे विदर्भाचा दौरा करीत आहेत, ते कोणत्या तोंडाने करीत आहेत हे माहित नाही, असं देखील अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे. अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना इशारा आणि विनंती करताना म्हटलं आहे, पवारसाहेब तुम्ही अमरावतीत येऊ नका, तुम्हाला नागरीक आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल.
कंगना रणौतच्या विरोधात
आता काँग्रेस तक्रार दाखल करणार
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आता पुन्हा एकदा असंच वादग्रस्त विधान केलं आहे. कंगनाने महात्मा गांधी यांच्याबाबत विधान केलं आहे. महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. असा दावा कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर केला आहे. तर, कंगनाच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असताना, काँग्रेसने तिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस कंगनाच्या या वक्तव्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करणार आहे.
कर्नाटकमध्ये भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी
कर्नाटकमध्ये भीक मागून गुजराण करणाऱ्या एका दिव्यांग व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या आठवड्यात कर्नाटकच्या बल्लारी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. ४५ वर्षीय बसवा उर्फ हुच्चा बस्या यांचं एका अपघातामध्ये निधन झालं. आयुष्यभर भीक मागून ते गुजराण करत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोकांची गर्दी झाली. बसवा यांना एक रुपया दिल्यानंतर काहीतरी चांगलं घडतं, अशी श्रद्धा लोकांची तयार झाली होती.
नाशिक जिल्ह्यात अजूनही 425
कोरोना रुग्णांवर उपचार
नाशिक जिल्ह्यात अजूनही 425 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात निफाडमध्ये 83, सिन्नरमध्ये 56 रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज बुधवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 551 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 694 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.
सातारा डेपोतील कर्मचाऱ्याचा
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
साताऱ्यातील मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा मागील दहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. असे असतानाच साताऱ्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. संतोष वसंत शिंदे (वय ३४, रा. आसगाव ता. सातारा) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. संतोष शिंदे हे मेढा एसटी डेपोचे कर्मचारी असून तुटपुंजा पगार व संपामुळे ते तणावाखाली होते.
हिंदूंनी काडी मारली तर अख्खा
हिंदुस्थान पेटल्याशिवाय राहणार नाही
अमरावतीमध्ये आत्मसमर्ण करण्यापूर्वी प्रवीण पोटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “अमरावती शहरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने अमरावती शहरात काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण केली आहे”. पुढे ते म्हणाले की, “हिंदू आपण पेटलेला पाहत आहोत…हिंदूंनी फक्त काडी दाखवली आहे, काडी मारलेली नाही. काडी मारली तर अख्खा हिंदुस्थान पेटल्याशिवाय राहणार नाही. प्रामुख्याने मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सांगतो की हिंदूंना चिरडू नये अन्यथा तुमचं आम्ही काहीही ठेवणार नाही”.
SD social media
9850 60 3590