बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी मंगळवारी भाजपला पुन्हा धक्का दिला़ भाजपशी काडीमोड घेत त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) मुख्यमंत्री म्हणून राजीनामा देऊन राष्ट्रीय जनता दलासह (राजद) अन्य घटकपक्षांच्या महाआघाडीचे नेते म्हणून सत्तास्थापनेचा दावा केला़ नव्या सरकारचा शपथविधी आज दुपारी होणार असून, नितीशकुमार हे मुख्यमंत्री, तर तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. भाजपप्रणीत ‘रालोआ’ सरकारमध्ये मुख्यमंत्री असूनही राजकीय कोंडमाऱ्यामुळे नितीशकुमार नाराज होत़े त्यामुळे ते भाजपची साथ सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती़ रविवारी नीति आयोगाच्या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवल्याने या चर्चेला वेग आला आणि संयुक्त जनता दलाच्या मंगळवारच्या बैठकीत काडीमोडावर शिक्कामोर्तब करण्यात आल़े भाजपने आधी चिराग पासवान आणि नंतर आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून ‘जदयू’ला कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याने ‘रालोआ’तून बाहेर पडणे योग्य असल्याची भूमिका नितीशकुमार यांनी या बैठकीत मांडल्याचे समजत़े
‘जदयू’च्या बैठकीनंतर नितीशकुमार यांनी थेट राजभवन गाठून राज्यपाल फगू चौहान यांच्याकडे ‘रालोआ’च्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला़ त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी जाऊन राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासह काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली़ अर्ध्या तासाने नितीशकुमार आणि तेजस्वी यादव हे घटक पक्षांच्या नेत्यांसह राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी महाआघाडी म्हणून सत्तास्थापनेचा दावा केला़ नितीशकुमार हे सात पक्षांच्या महाआघाडीचे नेतृत्व करणार असून, ते आठव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत़ याआधी २०१७ मध्ये नितीशकुमार यांनी राजदची साथ सोडून भाजपबरोबर सत्ता स्थापन केली होती़.
गेल्या नऊ वर्षांत नितीशकुमार यांनी दुसऱ्यांदा भाजपची साथ सोडली आहे. ‘जदयू’च्या निर्णयामुळे भाजपच्या अनेक नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. बिहारमध्ये ‘जदयू’ आणि भाजपमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपने वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांना अनेकदा पाटण्यास मध्यस्थीसाठी पाठवले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच बिहार दौरा केला़ आगामी लोकसभा निवडणुकीत ‘जदयू’सह भाजप आघाडी कायम असेल, असे त्यांनी त्यावेळी जाहीर केले होत़े त्यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव निवळेल, अशी आशा भाजप नेत्यांना होती. मात्र, नितीशकुमार यांनी वेगळा मार्ग पत्करल्याने भाजपचे २०२४ मधील गणितही बिघडणार असल्याचे मानले जात़े