आज दि.६ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

सरकारचा मोठा निर्णय! फेरीवाले अन् हातगाडीवाल्यांनाही मिळणार रोजगार

भारतात फेरीवाले, टपरीधारक आणि हातगाडीवाल्यांची संख्या खूप आहे. कोरोनाच्या काळात हातावर पोट असणाऱ्या समाजातील या घटकांचे प्रचंड हाल झाले. रोजगाराचे साधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळही आली होती. केंद्र आणि विविध राज्य सरकारांनी आता फेरीवाले, टपरीधारक अन् हातगाडीवाल्यांसाठी विविध योजना आणल्या आहेत.  या माध्यमातून त्यांना रोजगाराचं साधन उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. ‘आज तक हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

कोरोनाच्या काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. यात फेरीवाले, टपरीधारक आणि हातगाडीवाल्यांची संख्या अधिक आहे. या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आता केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे. या साठी केंद्राने स्वनिधी योजनेअंतर्गत 50 हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्याची तरतूद केली आहे. 14,000 फेरीवाले, टपरीधारक आणि हातगाडीवाल्यांना लाभ देण्यासाठी पीएम स्वनिधी योजना बनवली गेली आहे. या सर्वांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे. याशिवाय, शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापलेलं आहे. अशातच आता बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना थेट फोन करून या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विवेक अग्निहोत्रीने मागितली विनाअट माफी

चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्रीने मंगळवारी (६ डिसेंबर) दिल्ली उच्च न्यायालयाची विनाअट माफी मागितली. विवेक अग्निहोत्रीने भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना जामीन देण्यावरून दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती आणि विद्यमान ओरिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.या प्रकरणात विवेक अग्निहोत्रीने प्रतिज्ञापत्र दाखल करत विनाअट माफी मागितली असली, तरी यावर दिल्ली उच्च न्यायालयाचे समाधान झाले नाही. न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदूल आणि न्यायमूर्ती तलवंत सिंह यांच्या खंडपीठाने प्रतिज्ञापत्राद्वारे विनाअट माफी पुरेशी नसल्याचं म्हटलं. तसेच पुढील सुनावणीला १६ मार्च २०२३ रोजी विवेक अग्निहोत्रीने स्वतः न्यायालयासमोर हजर व्हावं, असं मत नोंदवलं.

महाराजांच्या वेशात कोण सरस? अक्षय कुमारचा लुक समोर येताच शरद केळकर ट्रेंडमध्ये

गेल्या काही महिन्यांपासून मराठी सिनेसृष्टीत ज्या सिनेमावरून वादंग निर्माण झाला तो सिनेमा म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात. सिनेमाचा फर्स्ट लुक लाँच झाल्यापासून सिनेमा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लुक समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र महेश मांजरेकर आणि अक्षय कुमार यांना चांगलंच ट्रोल केलं. आधीच ट्रोलिंग कुठे तरी थांबतय तोवर अक्षय कुमारचा सिनेमातील महाराजांच्या भूमिकेतील एक सेटवरील एक व्हिडीओ समोर आला. ज्यानं पुन्हा एकदा अक्षय कुमार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला.  मात्र एकीकडे अक्षयला ट्रोल करत असताना दुसरीकडे मात्र अभिनेता शरद केळकर ट्विटवर ट्रेंडिगमध्ये होता.

मराठी रंगभूमीवरील नटसम्राटाची एक्झिट; ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं निधन

मराठी रंगभूमीवरील नटस्रमाट म्हणून ज्यांची ओळख होती असे ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘अखेरचा सवाल’, ‘दुर्गा’, ‘स्पर्धा’, ‘मत्सगंधा’ सारख्या अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी काम केली आहे. मोहनदास यांनी अनेक दशके मराठी रंगभूमीची सेवा केली. मराठी नाटकांमध्ये मोहनदास सुखटणकर यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांच्या जाण्यानं मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार त्यांच्या अंत्यविधीसाठी दाखल झाले असून मोहनदास यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

शोएब अख्तरने पाकिस्तानच्या संघावर काढला राग, इंग्लंडचे केले कौतुक

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभवानंतर पाकिस्तानच्या संघावर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने राग काढला आहे. त्याने पाकिस्तानच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना इंग्लंडच्या संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर पाकिस्तानच्या खेळाडुंवर सडकून टीका केली.

टी२० वर्ल्ड कपवेळी शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ टाकला होता. त्यावेळी त्याने भारतीय संघ सेमीफायनलमधून बाहेर पडेल असं म्हटलं होतं. त्यावेळी अख्तरला भारतीय चाहत्यांनी बरंच सुनावलं होतं. तर शमीनेसुद्धा फायनलमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरला ट्रोल केलं होतं.

टीम इंडियाला मिळाला नवीन प्रशिक्षक; राहुल द्रविडच्या निकटवर्तीयाची BCCI कडून निवड

टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळावा यासाठी मागील काही दिवसांपासून अनेक स्तरावर चर्चा सुरु आहे. अखेरीस आता बीसीसीआयने याबाबत निर्णय घेत राहुल द्रविडच्याच स्वीय सहकाऱ्याची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. याबाबत बीसीसीआयने स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकपदी ऋषिकेश कानिटकर यांची निवड केल्याचे समजत आहे. यासह रमेश पोवार हे आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारतील असेही सांगण्यात आले आहे.

स्वयंसेवकांच्या फौजेत नवी मुंबईतील तरूण

सध्या जगभर ‘फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२’चे वारे वाहत असून जगभरातील फुटबॉलप्रेमी आपापल्या देशाच्या वा आवडत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी कतारमध्ये दाखल झाले आहेत. दिवसेंदिवस स्पर्धेतील चुरस वाढत असून यंदा विश्वचषकावर कोणता देश आपले नाव कोरणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. त्याच वेळी ‘फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२’च्या व्यवस्थापनात खारूताईचा वाटा उचलणाऱ्या स्वयंसेवकांच्या लवाजम्यात स्थान मिळविणारा नवी मुंबईमधील सन्मय राजगुरू हा तरुण सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे.फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे व्यवस्थापन विनाअडथळा पार पडावे यासाठी कतारसह जगभरातील तब्बल २० हजार स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. हे समस्त स्वयंसेवक विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. या स्वयंसेवकांच्या फौजेत नवी मुंबई जवळील उलवे परिसरातील सन्मय राजगुरूचाही समावेश आहे. सन्मय कतारमधील दोहा येथील ‘एज्युकेशन सिटी स्टेडियम’मध्ये कार्यरत आहे. फिफाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याने स्वयंसेवकपदासाठी अर्ज केला होता. प्रत्यक्ष मुलाखत आणि आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सन्मयला स्वयंसेवक म्हणून निवड झाल्याचा ई-मेल आला आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.