कोल्हापूरातील नूल गावात संध्याकाळी टीव्ही आणि मोबाईल राहणार बंद

मुलांमध्ये सध्या मोबाईल वापराचे प्रमाण हे भरपूर प्रमाणात वाढले आहे. त्याचबरोबर मोबाईल आणि टीव्ही यांचा अतिरेक देखील वाढला आहे. मोबाईल आणि टीव्हीच्या अतिरेकाचे मुलांवर होणारे दुष्परिणाम हा पालक आणि तज्ज्ञांच्या काळजीचा विषय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावानं या प्रश्नावर उपाय शोधला आहे.

कोल्हापूरमध्ये गडहिंग्लज तालुक्यातील नूल या गावात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावातील सर्व टीव्ही मोबाईल हे संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहेत. रोज संध्याकाळी 7 ते 8.30 या वेळेत गावातील सर्व टीव्ही आणि मोबाईल बंद असतील.  गावच्या सरपंच प्रियांका यादव यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या महिला पालक मेळाव्यात एकमतानं हा निर्धार करण्यात आल्याचं सरपंच यादव यांनी सांगितलं.

सरपंच यादव यांनी या मेळाव्यात गावातील सर्व पालकांना यासंबंधी आवाहन केले होते. ‘मुलांना जबाबदार नागरिक घडविण्यासाठी काही गोष्टींचे स्वातंत्र देण्याबरोबरच काही गोष्टींवर निर्बंधही घालावे लागतील. त्यासाठी रोज सायंकाळी 7 ते 8.30 या वेळेत सर्व पालकांनी आपल्या घरातील टीव्ही व मोबाईल बंद ठेवून मुलांचा अभ्यास घ्यायला हवा, असे गावातील सर्व पालकांना त्यांनी समजावून सांगितले होते.

यशदा पुणे यांमार्फत होणारे सरपंचांसाठीचे ट्रेनिंग सांगली शांतिनिकेतन लोक विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणाहून प्रेरित होऊन त्याच बरोबर मार्गदर्शिका प्रा. स्वाती कोरी आणि सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य, सर्व शिक्षकवर्ग यांच्या सहकार्याने या निर्णयाची अंमबजावणी शक्य आहे, असं  यादव यांनी स्पष्ट केलं.

काय होतील फायदे ?

सध्या मुलांचा कल हा अभ्यासापेक्षा मोबाईल, टिव्ही, इंटरनेट अशा गोष्टींकडे वाढला आहे. त्यामुळे त्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी या निर्णयाचा नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर त्यांची आणि त्यांच्या बरोबर गावची देखील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील मदत होणार आहे. तर रोज काही काळ मोबाईल, टीव्ही यांच्या स्क्रीनपासून दूर राहिल्यामुळे मुले स्क्रिन ॲडीक्शन सारखे आजारांपासून सुरक्षित राहण्यास देखील मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.