राजेश खन्ना यांच्या 79व्या जयंती (29 डिसेंबर) रोजी, त्यांच्यावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्याची यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही. देशातील सर्वात आयकॉनिक स्टार म्हणून आपले स्थान निर्माण करणाऱ्या काकांनी खऱ्या अर्थाने पहिले सुपरस्टार म्हणून जगाचे मनोरंजन केले. सलग 17 मोठे ब्लॉकबस्टर देणाऱ्या या सुपरस्टारवर आता चित्रपट बनणार आहे.
राजेश खन्ना यांना प्रेक्षक आणि चाहत्यांकडून मिळालेले प्रेम खूपच वेगळे होते, जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते आणि त्यानंतर कधीही पाहिले गेले नाही. त्यांची क्रेझ इतकी होती की, महिला चाहत्या त्यांना रक्ताने पत्र लिहायच्या, त्यांच्या फोटोंशी लग्न करायच्या.
चेतन आनंदच्या ‘आखरी खत’ (1966) मधून पदार्पण करणार्या या अभिनेत्याला यश आणि अपयश दोन्हीची चव चाखायला लागली. जतिन खन्ना या नावाने जन्मलेल्या अभिनेत्याला लोक इंडस्ट्रीत ‘काका’ या नावाने हाक मारायचे. गौतम चिंतामणी यांच्या पुस्तकात ज्या पद्धतीने अभिनेत्याचे चित्रण करण्यात आले आहे त्यातून बायोपिक बनवला जाणार असून, निखिल द्विवेदी अनेक वेगळे पैलू मोठ्या पडद्यावर आणणार आहेत. हा चित्रपट एक श्रद्धांजली ठरणार आहे.
फराह खान दिग्दर्शित या चित्रपटात राजेश खन्ना यांची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भारतातील एकमेव सुपरस्टारच्या या भूमिकेत चपखल बसने कोणत्याही अभिनेत्यासाठी सोपे असणार नाही यात शंकाच नाही. परंतु, जर एखाद्या अभिनेत्याने या भूमिकेसाठी साइन अप केले आणि ती चोख बजावली, तर तो नक्कीच सर्वोत्कृष्ट ठरेल.
अधिकृत घोषणेनंतर कळणार पूर्ण माहिती!
याविषयी सांगताना निखिल द्विवेदी म्हणाले की, ‘होय, गौतम चिंतामणीच्या ‘डार्क स्टार’ या पुस्तकाचे हक्क आता माझ्याकडे आहेत आणि हा चित्रपट बनवण्यासाठी माझी फराह खानशी चर्चा सुरू आहे. मी सध्या एवढीच माहिती देऊ शकतो. चित्रपटाबाबत मोठी घोषणा होताच, मी ती नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. राजेश खन्ना यांचे चरित्र मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’