देशावर दुधाचे संकट येणार? लम्पी स्कीन रोगामुळे देशात 50 हजार गायींचा मृत्यू

देशात गायींवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रार्दुभाव होत असल्याने दुधाचे संकट येण्याची शक्यता आहे.लम्पी स्कीन डिसीज म्हणजे एलएसडी या संसर्गजन्य रोगामुळे महाराष्ट्रासह 9 राज्यात थैमान घातले आहे. या रोगामुळे देशातील 49 हजार 526 गायींचा बळी गेला आहे. तर महाराष्ट्रात 11 गायी दगावल्या आहेत. त्यामुळे ‘गायींचे लसीकरण वाढवा, गायी ‘वाचवा’ असे मिशन पशू वैद्यकीय यंत्रणेने हाती घेतले आहे. दरम्यान हा रोग लवकर आटोक्यात नाही आला तर देशावर दुधाचे संकट ओढवू शकते.

महाराष्ट्रात जळगाव, अकोला, अहमदनगर आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये एलएसडीची साथ मोठ्या प्रमाणात आली आहे. या जिल्ह्यांत 36 हजार गायींना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. केंद्र सरकारने या साथीची गंभीर दखल घेत महाराष्ट्रासह नऊ राज्यांमध्ये गायींच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. राजस्थान, पंजाब, गुजरात, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात देखील लस देणे सुरू असून लाखो डोसची ऑर्डर देण्यात आली आहे.

एलएसडीची साथ 2019 मध्येच खरे तर सुरू झाली. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या आजाराच्या पहिल्या रुग्ण गायी आढळल्या. मात्र तेव्हा भारतासह उभे जग कोरोनाशी झुंजत असल्याने ही साथ रडारवर आली नाही. गेल्या उन्हाळ्यात एलएसडीने पुन्हा डोके वर काढले आणि बघता बघता पश्चिम आणि उत्तर भारतातील दूध उत्पादक राज्यांमध्ये म्हणजेच महाराष्ट्रापासून काश्मीरपर्यंत एलएसडी पसरला.

महाराष्ट्राचे पशू संवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एलएसडीची गायींना लागण होण्याचे हे तिसरे वर्ष आहे. मात्र गतवर्षी एकाही गायीचा मृत्यू झाला नाही. यावेळी मात्र परिस्थिती गंभीर आहे. तब्बल १३ लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या देशभरातील डेअरी उद्योगासमोर मोठा धोका एलएसडीच्या साथीने निर्माण केला आहे. कारण एलएसडीचा पहिला मोठा परिणाम म्हणजे या आजारामुळे दूध उत्पादन घटते.

भारत जगातील क्रमांक एकचा दूध उत्पादक देश आहे. 2020 – 21 मध्ये भारताने 209 दशलक्ष टन दूध उत्पादित केले आहे. जगाच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात भारताचा हिस्सा 23 टक्के आहे. त्यामुळे एलएसडीच्या साथीचा मोठा फटका भारताला बसू शकतो. राजस्थानच्या 33 पैकी 32 जिल्ह्यांमध्ये 7.94 लाख गायींना एलएसडीची लागण झाली व 34 हजार 243 गायींचा मृत्यू झाला. भारतातील हे सर्वाधिक प्रमाण असल्याचे सांगण्यात आले आहे.

एलएसडी कशामुळे होतो… 

एलएसडी हा चावणाऱ्या माशा, डास आणि प्रदूषित अन्न व पाण्याद्वारे पसरतो.

कॅप्रीपॉक्स व्हायरस असे त्याचे नाव आहे. या व्हायरसचा फलन काळ चार ते चौदा दिवसांचाच असतो. या काळात व्हायरस लिम्फ नोडवर म्हणजेच लसिका ग्रंथींवर हल्ला चढवतो.

ही लसिका रक्ताभिसरणात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने यात लिम्फ नोडचा आकार वाढतो. गायींच्या त्वचेला मोठा फोड यावा तसे गळू दिसू लागते. म्हणूनच याला लम्पी स्कीन डिसीज म्हणतात.

ताप येणे, भूक कमी होणे, लाळीचे प्रमाण वाढणे, नाकातून स्त्राव होण्याचे प्रमाणही वाढते. गायीचे वागणेही विचित्र बदलते.

एलएसडी झालेल्या गायीचे वजन घटते आणि दूध देण्याचे प्रमाणही कमी होते. या आजाराने ग्रस्त गायी गर्भधारणा करू शकत नाहीत. त्यांचे गर्भपाताचे प्रमाणही वाढते.

अनेक व्हायरस संसर्गाप्रमाणेच एलएसडीवरही उपाय नाही. संसर्ग झालेल्या जनावरांच्या लक्षणांवरच उपचार केले जातात.

तूर्तास गायींपासून माणसाला याची लागण झाल्याची कुठेही नोंद नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.