आज दि.३ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा गोंधळ थांबेना! आता पृथ्वीराज चव्हाणांची वेगळी मागणी

काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षाच्या निवडीवरून पक्षात सुरू असलेला गोंधळ आता लवकर शांत होणार नसल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदार यादी सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या असंतुष्ट ज्येष्ठ नेत्यांच्या गटातील जी-23 चे सदस्य मानले जाणारे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांना निवडणुकीसाठी मतदार याद्या सार्वजनिक करण्याच्या सूचना द्याव्यात.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत मतदार यादी जाहीर केली जाते. त्यामुळे मतदार यादी संकेतस्थळावर टाकून मतदारांना ईमेलद्वारे मतदार यादी देण्यात यावी. वेबसाईटमध्ये काही अडचण असल्यास ती ईमेल करावी. निवडणुकीची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि काँग्रेसवरील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी मतदार यादी सार्वजनिक करण्याचे किंवा इच्छुक उमेदवाराला ई-मेल करण्याचे निर्देश द्यावेत. विशेष म्हणजे काँग्रेस खासदार मनीष तिवारी, शशी थरूर, कार्ती चिदंबरम यांनी यापूर्वीच मतदार यादी सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेसचा राजीनामा देणारे गुलाम नबी आझाद यांनीही काँग्रेस सदस्यत्व आणि अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरुन विजय वडेट्टीवारांचा इशारा

गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरुन राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारची 12 आमदारांची यादी रद्द केल्यास, महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात जाणार, असा इशारा काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भात एक पत्र पाठवले आहे. या पत्रानंतर विजय वडेट्टीवार यांनी हा इशारा दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार सुबोध भावे; समोर आला दमदार लुक

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळखला जातो. सतत काहीतरी नवीन भूमिका करण्यावर त्याचा भर असतो. प्रेक्षकही त्याला भरभरून प्रतिसाद देतात. त्याने मराठीमध्ये चरित्रपट साकारण्याची परंपरा रुजवली. बालगंधर्व, लोकमान्य टिळक तसेच काशिनाथ घाणेकर  यांच्या भूमिका लीलया पेलल्या. आता पुन्हा एक ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी सुबोध भावे सज्ज झाला आहे. तो लवकरच एका महत्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.काल सुबोध भावेने सोशल मीडियावर ‘उद्या सकाळी महत्वाची घोषणा करणार आहे’ अशी पोस्ट टाकली होती. त्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. सुबोध भावे नवीन ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. सुबोध भावे ‘हर हर महादेव’ या चित्रपटात  ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांची भूमिका साकारणार आहे.

काँग्रेसबद्दल प्रश्न विचारताच नारायण राणेंची मजेशीर प्रतिक्रिया; ऐकून मुख्यमंत्र्यानाही हसू आवरेना

अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे काही आमदार काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाणार असल्याच्या राजकीय चर्चा सध्या सुरू आहेत. यादरम्यानच अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचं वृत्त समोर आल्यानं चर्चांना आणखीच उधाण आलं. यावर आता केंद्रीय लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, नारायण राणेंची प्रतिक्रिया ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही हसू आवरलं नाही.मुख्यमंत्री शिंदे यांनी नारायण राणे यांच्या जुहूतील ‘अधिश’ या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी अशोक चव्हाण आणि काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की जर काँग्रेसचे नेते शिंदेसोबत आले तर ते शिवसैनिक होतील. पुढे राणे यांना विचारण्यात आलं की काँग्रेस नेते हिंदुत्वाची भूमिका स्वीकारणार याबद्दल काय वाटतं? यावर बोलताना राणे म्हणाले, की ते काँग्रेसचे राहणार नाहीत. एकतर ते शिंदेंकडे शिवसैनिक म्हणून जातील किंवा भाजपामध्ये येतील. उरलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ. राणेंचं हे उत्तर ऐकताच मुख्यमंक्षी एकनाथ शिंदे यांनाही हसू आवरलं नाही आणि ते हसू लागले.

 ‘पन्नास खोके मंत्री OK’; धुळे दौऱ्यात दादा भुसेंचा शेतकऱ्यांकडून निषेध

शिंदे गटातील सदस्य आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे आज धुळे जिल्ह्याचा दौऱ्यावर असताना त्यांना एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. दादा भुसे हे धुळे दौऱ्यावर असताना त्यांच्या दौर्‍यादरम्यान शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तसेच दादा भुसे हे साक्री तालुक्यातील कासारे गावात उद्घाटन करत असताना शेतकर्‍यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. इतकेच नव्हे तर पन्नास खोके मंत्री ok अशा जोरजोरात घोषणा देत यावेळी शेतकर्‍यांनी दादा भुसे यांचा निषेध केला.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत दाखल; राज्यपालांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदीं चे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या मुंबईत दाखल झाले आहेत. दौऱ्यादरम्यान डोवाल यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानावर भेट घेतली. डोवाल आणि मुख्यमंत्र्यांची ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. डोवाल यांनी सकाळीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. जवळपास अर्धा तास विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ स्प्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्तपूर्वी सुरक्षाविषयक आढावा घेण्यासाठी डोवाल मुंबईत दाखल झाले आहेत.

महंगाई पे हल्ला बोल ; काँग्रेसची दिल्लीत रविवारी महारॅली

मोदी सरकारची दिशाहीन आर्थिक नीती आणि महागाई याचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने दिल्लीत रविवार (४ सप्टेंबर) रामलीला मैदानावर महा रॅली काढण्यात येणार असून महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले आहेत,अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष,माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

पुणे तापणार, पुढील काही दिवस तापमानात होणार वाढ; हवामान खात्याचा अंदाज

राज्यात काही ठिकाणी कडाक्याचे ऊन जाणवते आहे. त्यात आता पुण्यात काही दिवसाच्या तापमानान वाढ होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. शुक्रवारी दिवसभरात पुणे शहर परिसरात 33.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. यावरुन हवामान खात्याने आता शहरातील दिवसाचे तापमान उच्च पातळीवर राहणार, अशी शक्यता वर्तवली आहे

ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

भारताने जागतिक स्तरावर आपली आर्थिक ताकद दाखवून दिली आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताने ब्रिटनला मागे टाकले आहे. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश बनला आहे.भारताच्या मागे पडणे हा ब्रिटनसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ब्रिटन सध्या अनेक संकटातून जात आहे, ज्यात महागाई, कमी वाढ आणि राजकीय अस्थिरता यांचा समावेश आहे. त्याच वेळी, भारत दीर्घ काळापासून जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.

गुजरात दंगल प्रकरणात तीस्ता सेटलवाड यांना जामीन मिळाला

सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार तीस्ता सेटलवाड यांना शुक्रवारी (२ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीत सरकारमधील उच्च अधिकाऱ्यांना गुंतवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सेटलवाड यांच्या याचिकेवर भारताचे सरन्यायाधीश यू यू लळित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सुनावणी केली. त्यात न्यायमूर्ती रवींद्र भट आणि सुधांशू धुलिया यांचाही समावेश होता.

महान बॅट्समन ब्रायन लारा पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसणार!

क्रिकेट विश्वातील दिग्गज बॉलर्सना एकेकाळी आपल्या जबरदस्त बॅटिंगने घाम फोडणारा वेस्ट इंडिजचा महान बॅट्समन ब्रायन लारा पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या पुढच्या सीझनमध्ये लारा ‘डग आउट एरिया’मध्ये दिसेल. आयपीएलमधल्या सनरायजर्स हैदराबाद या टीमने त्याला हेड कोच बनवण्याचा निर्णय घेतलाय. ‘टाइम्स नाऊ’ने याबाबत वृत्त दिलंय.

पाकिस्तानविरुद्ध सामन्यापूर्वी विराटचा ‘हाय अल्टिट्यूड मास्क’ लावून सराव! 

आता भारत पुन्हा एकदा पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. ही लढत 4 सप्टेंबरला दुबईतल्या दुबई इंटरनॅशनल स्टेडियमध्ये होणार असून दोन्ही संघ कसून सराव करताना दिसत आहेत. विराट कोहली ह्या सामन्यासाठी कसून सराव करताना दिसतोय. विराटचा सराव करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात विराटने सरावादरम्यान हाय अल्टिट्युड मास्क लावलेला दिसतोय. या मास्कमुळे श्वास घेतल्यानंतर फुफ्फुसांचा विस्तार होतो तसंच त्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते. केवळ क्रिकेटपटूंसाठीच नाही तर एकंदरच सर्व खेळाडूंसाठी फुफ्फुसांची कार्यक्षमता उत्तम असणं अगदी गरजेचं असतं. या मास्कचा उपयोग हा गिर्यारोहकांसाठी वरदान ठरतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे गिर्यारोहण करताना शिखराकडे जाताना ऑक्सिजनची कमतरता भासते. त्यावेळेस या मास्कमुळे गिर्यारोकाला श्वास घेणं सोपं होतं. विराटने सरावादरम्यान पळताना जेव्हा मैदानाला फेर्‍या मारल्या त्यावेळेस त्याने हा हाय अल्टिट्युड मास्कचा वापर केला होता. पण पळण्याचा सराव संपल्यावर त्याने हा मास्क काढून ठेवल्याचं व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं. सरावादरम्यान फिजिकल ट्रेनर सोहम देसाईंनी विराट कोहलीला मार्गदर्शन केलं.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.