दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या (एक्स्प्रेस वे) दिल्ली- दौसा- लालसोट या २४६ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी करणार आहेत. या नव्या रस्त्यामुळे, राष्ट्रीय राजधानीवरून जयपूरला जाण्याचा वेळ सध्याच्या पाच तासांवरून सुमारे साडेतीन तासांपर्यंत कमी होणार आहे.
१२ हजार १५० कोटी रुपयांहून अधिक खर्चासह विकसित करण्यात आलेल्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या पहिल्या पूर्ण झालेल्या या टप्प्यामुळे या संपूर्ण भागाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.रविवारी मोदी हे दौसा येथे १८,१०० कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण करणार असून, बंगळूरुतील येलहांका हवाई दल स्थानकावर एअरो इंडिया २०२३चे उद्घाटन करण्यासाठी सोमवारी कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत.हा मार्ग दिल्ली, हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र या सहा राज्यांतून जात असून कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा, सुरत शहरांना जोडतो.
१३,८५६ किलोमीटर लांबीचा
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे हा देशातील सर्वात लांब एक्स्प्रेस वे राहणार असून, त्याच्यामुळे दिल्ली व मुंबईदरम्यानचे प्रवास अंतर १२ टक्क्यांनी, म्हणजे १४२४ किमीवरून १२४२ किमी इतके कमी होणार आहे. या मार्गावरील प्रवासाचा वेळ २४ तासांवरून १२ तासांपर्यंत, म्हणजे ५० टक्क्यांनी कमी होणार आहे.