ज्योतिषाला हात दाखवण्याची मला गरज नाही. कारण समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मनगटामध्ये ताकद असायला हवी आणि ते बळ मला धर्मवीर आनंद दिघे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहे. आणि मनगटातील ताकद आम्ही ३० जूनलाच दाखवली असल्याचा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर साधला. कराडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. दैनिक ‘सामना’मधील ‘मुख्यमंत्र्यांचे हात दाखवून अवलक्षण’ या टीकेला उत्तर देताना, संजय राऊत हे महान नेते असल्याची खोचक टिपणी करून, देवदर्शन करणे गुन्हा आहे का, असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. गुवाहाटीला आपण पुन्हा जाणार असल्याबाबत विचारले असता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिलंय, त्यासाठी आम्ही सर्व पन्नास जण जाणार असल्याचे स्पष्ट करताना, तेथे कामाख्यादेवीचे जागृत देवस्थान असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आमच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अस्मितेचा प्रश्न असून, राज्यातून एकही गाव जाणार नाही. सीमाभागातील लोकांच्या काही अडचणी असतील तर त्यावर आम्ही संवेदनशील असू, त्यांच्या भावना जाणून घेतल्या जातील.
- पंढरपूरच्या व्यापाऱ्यांनी कॉरीडोरला विरोध केला आहे. कॉरीडॉर रद्द न झाल्यास कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या पूजेला बोलवू, असा इशारा दिला असल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, पंढरपूरचा विकास होणे आवश्यक असल्याने त्याचा आराखडा बनवला जातोय. स्थानिक लोकांना विश्वासात घेवून हे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शिवाजी महाराजांबद्द्लच्या वक्तव्याशी आम्ही कोणीही सहमत नसून शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. आमची भूमिका लपूनछपून नसते. जे काही करायचे ते स्वच्छपणे जनतेच्या हिताचे करायचे.
- गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात भरपगारी सुटी जाहीर केली नसून या बातमीमध्ये तथ्य नाही. भाजपसोबत युती करूनच मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुका लढवल्या जातील.