महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 27 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. 27 फेब्रुवारी ते 25 मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे, तर 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, पण या अधिवेशनाआधीच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय सर्जिकल स्ट्राईक होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदार बच्चू कडू यांनी याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. येत्या 15 दिवसांमध्ये 10-15 आमदार फुटणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
‘सरकार फक्त बहुमतात नाही तर अतिबहुमतात आहे. 20-25 आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने पूर्ण राहील. सरकार कार्यकाळ पूर्ण करेल’, असा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
‘इतर पक्षातले आमदार आहेत, त्यांचाही पक्षप्रवेश होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही याचं कारण कोर्ट आणि पक्षप्रवेश आहे. 10 ते 15 आमदार पक्ष सोडणार आहेत. पक्ष कोणता हे सांगणार नाही. ठाकरे गटात आमदारच नाही राहिले, बाकीच्या पक्षातले आहेत. अधिवेशनाच्या आधी या आमदारांचा पक्ष प्रवेश होईल’, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
एकीकडे बच्चू कडू यांनी हा दावा केला असतानाच 14 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये निकाल विरोधात गेला तर राज्य सरकारचा प्लान बी तर बच्चू कडूंनी बोलून दाखवला नाही ना? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.