आयपीएल 2022 संपल्यानंतर आता चाहत्यांना भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजची उत्सुकता आहे. 5 टी-20 मॅचची ही सीरिज जेव्हा खेळवली जाईल तेव्हा क्रिकेट विश्वाचा चेहरा मोहरा बदलणारी घडामोड घडणार आहे. 2023 ते 2028 या कार्यकाळासाठी आयपीएल मीडिया राईट्सवर बोली लागणार आहे. यातून बीसीसीआयला कोट्यवधी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
आयपीएल मीडिया राईट्ससाठी आधीच टेंडर काढण्यात आले आहेत. आतापर्यंत 5 कंपन्यांमध्ये यासाठी स्पर्धा आहे, पण ऑक्शनआधी डोळे विस्फारून टाकतील, अशी शक्यता समोर आली आहे. आयपीएल मीडिया राईट्स 50 ते 60 हजार कोटी रुपयांना विकले जाऊ शकतात, अशी शक्यता ब्रोकरेज फर्म एलारा सिक्युरिटीजने वर्तवली आहे.
आयपीएलची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली
मागच्या वेळी आयपीएलचा लिलाव झाला तेव्हा 2018-2022 साठी बीसीसीआयला 16,300 कोटी रुपये मिळाली, पण आता आयपीएल स्पर्धा मोठी झाली आहे. टीमची संख्याही 10 झाली आहे, त्यामुळे आयपीएलची ब्रॅण्ड व्हॅल्यूही वाढली आहे.
आयपीएल मीडिया राईट्ससाठी पाच कंपन्यांमध्ये रेस आहे, यात वायकॉम, डिज्नी हॉटस्टार, सोनी, झी आणि अमेझॉन यांचा समावेश आहे. यावेळी डिजीटल प्लॅटफॉर्मवरही फोकस करण्यात आल्यामुळे अमेझॉनसारखा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मही या स्पर्धेत उतरलं आहे.
आयपीएल मीडिया राईट्समध्ये यावेळी बऱ्याच गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. यामध्ये टीव्ही राईट्स, डिजीटल राईट्स, प्ले-ऑफ राईट्स, परदेशात मॅच दाखवण्याचे राईट्स यांच्या समावेश आहे. या चार सेटसाठी वेगवेगळी बेस प्राईज आहे. याच आधारावर बोली लावली जाणार आहे. यामध्ये टीव्ही राईट्सची किंमत 49 कोटी रुपये प्रती मॅच आहेत.
आयपीएल 2022 च्या टीव्ही रेटिंग्समध्ये मोठी पडझड झाली होती, ज्यामुळे यंदाची आयपीएल निरस झाल्याचंही बोललं गेलं. असं असलं तरी आयपीएलच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूवर कोणताही फरक पडलेला नाही. आयपीएल वर्षातून दोनदा खेळवली जाईल, असंही बोललं जात आहे, पण सध्या तरी ही फक्त चर्चाच आहे.