विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे दोन उमेदवार निश्चित झाले आहेत. शिवसेना नेते सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही उमेदवार आज दुपारी दोन वाजता विधान भवनात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी शिवसेनेचे नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत. राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीसाठी वेगवान घडामोडी घडत आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. त्यानंतर 20 जूनला विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर सचिन अहिर यांनी आपला वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडला. त्यानंतर आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी सुद्धा झाले. आदित्य ठाकरे यांच्यासाठी मतदारसंघ सोडणाऱ्या सचिन अहिर यांचं पूनर्वसन करण्यासाठी आता शिवसेनेने त्यांना विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.
राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेच्याही निवडणुका होणार आहे. एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परीषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. यामध्ये रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. त्यामुळे या जागी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कुणा-कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
भाजपकडून प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे यांना उमेदवारी दिली होती. सदाभाऊ खोत आणि प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर या ना त्या मुद्यावरून जोरदार हल्लाबोल करत आहे. सदाभाऊ खोत यांनी अनेक आंदोलनातून कायम चर्चेत राहिले आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना पुन्हा संधी मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
तर राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहे. सध्या ते विद्यमान सभापती आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल. तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
या आमदारांचा संपला कार्यकाळ
रामराजे निंबाळकर
सुभाष देसाई
प्रविण दरेकर
प्रसाद लाड
सदाभाऊ खोत
संजय दौंड
विनायक मेटे
दिवाकर रावते