भूकंपबळी ११ हजारांवर, तुर्कस्तान, सीरियात मदत न पोहोचल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती

तुर्कस्तान व सीरियातील भूकंपबळींची संख्या ११ हजारांच्याही पुढे गेली आहे. या दशकातील हा सर्वाधिक प्राणहानी करणारा असा हा विनाशकारी भूकंप ठरला आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान या भूकंपग्रस्त क्षेत्रास सध्या भेट देत आहेत. त्यांनी सांगितले, की एकटय़ा तुर्कस्तानमधील मृतांची संख्या साडे आठ हजारांच्या पुढे गेली आहे. पहिल्या दिवशी बचावकार्य तोकडे पडल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु त्यानंतर आता मदत कार्याने वेग घेतला आहे, याबाबत स्थिती सुधारल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या कोणत्याही नागरिकास आम्ही मदतीपासून वंचित ठेवणार नसल्याचे एर्दोगान यांनी स्पष्ट केले. तुर्कस्तान व सिरियात भूकपग्रस्त भागात ठिकठिकाणी अनेक बचाव पथके दिवस-रात्र काम करत आहेत. या विनाशकारी भूकंपामुळे कोसळलेल्या हजारो इमारतींच्या ढिगाऱ्यांतून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.  बुधवारी मृतांची संख्या अकरा हजारांवर गेली आहे. हा भूकंप एका दशकाहून अधिक काळातील सर्वात प्राणघातक ठरला आहे.

नेपाळमध्ये २०१५ मध्ये आलेल्या ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात आठ हजार ८०० मृत्युमुखी पडले होते. दुर्दैवाने त्यापेक्षाही हा भूकंप अधिक प्राणघातक ठरला आहे. तुर्कस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले, की देशातील मृतांची संख्या सात हजार १०८ वर पोहोचली असून, शेजारच्या सीरियातील मृतांसह एकूण मृतांची संख्या नऊ हजार ६३८ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, सीरियातील सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या भागात मृतांची संख्या एक हजार २५० वर पोहोचली आहे, तर दोन हजार ५४ जखमी झाले आहेत. ‘व्हाईट हेल्मेट’ या स्वयंसेवी संस्थेच्या माहितीनुसार बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या वायव्य भागात एक हजार २८० जण मृत्युमुखी पडले आहेत व दोन हजार ६०० हून अधिक जखमी झाले आहेत.

मृत आईशी नाळ जोडलेले अर्भक जिवंत

सिरियातील गृहयुद्धामुळे मुख्य प्रवाहापासून वेगळय़ा पडलेल्या सिरियातील शहरे आणि गावांतील इमारती-घरांच्या ढिगाऱ्यांतून मदतीसाठीचा आक्रोश शांत होऊ लागला आहे. मदतीची वाट पाहणाऱ्यांची निराशा वाढत चालली आहे. गेल्या एक तपापासून चाललेल्या गृहयुद्ध व निर्वासितांच्या समस्येने ग्रासलेल्या सिरियाच्या दु:ख-वेदनेत या भूकंपामुळे भरच पडली आहे. सोमवारी दुपारी वायव्य सीरियातील जिंदरीस या गावात रहिवाशांना मृत आईशी नाळ जोडलेले एक रडणारे नवजात अर्भक आढळले. या छोटय़ाशा गावात इमारत कोसळून सर्व कुटुंब मृत्युमुखी पडले होते. मात्र या कुटुंबातील वाचलेले हे एकमेव अर्भक होते, असे या कुटुंबाच्या नातलगांनी सांगितले.

दोन कोटी ३० लाखांना झळ?

सिरियासारख्या भागात अनेक संकटांवरचे हे विनाशकारी संकट असल्याचे सांगून जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी अ‍ॅडेलहेड मरशग यांनी या भूकंपग्रस्त प्रदेशात तब्बल दोन कोटी ३० लाख नागरिकांना झळ पोहचल्याची शक्यता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.