कर्नाटक मध्ये जेवणातून 50 जणांना विषबाधा

कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहसमारंभात जेवलेल्या 50 लोकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. जेवनानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शिवमोगा जिल्ह्यातील अलाड हल्ली गावातील ही घटना आहे.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार अलाड हल्ली गावात एका विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तब्बल 500 लोकांनी जेवन केले. मात्र यातील 50 जणांना जेवनानंतर त्रास जाणवू लागला. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयता हलवण्यात आले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, रुग्णांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ. श्रीधर एस यांनी दिली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिवमोगा जिल्हा परिषदेचे सीईओ एमएल वैशाली यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. या घटनेनंतर लग्नात बनवण्यात आलेल्या जेवनाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. संबंधित रुग्णांना जेवणातून किंवा पाण्यातून विषबाधा झाली असावी असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. अन्नातून विषबाधा झाल्यास पोटात दुखणे, अशक्तपणा, डोकेदुखणे , चक्कर येणे यासारखे लक्षणे दिसून येतात.

नुकताच छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यातून देखील असाच प्रकार समोर आला होता. तेराव्याच्या जेवनातून 49 लोकांना विषबाधा झाली होती. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्या रुग्णालयाचे डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले, गावातच कॅम्प लावून रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. बालोद जिल्ह्यातल्या बोहारडी या गावातील ही घटना आहे. जेवनानंतर संबंधित लोकांना चकरा येणे, अशक्तपणा, पोटात दुखणे अशी लक्षणे दिसून आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.