केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर राज्य सरकारनेदेखील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली आहे. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येणार आहे. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ वरुन ३४ टक्के इतका होणार आहे.
पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची आज घोषणा केली आहे.
वैद्यकीय उपकरणे खरेदी जीईएम (GeM) पोर्टलद्धारे
वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत वापरली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या माध्यमातून खरेदी करावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
दहीहंडी पथकातील गोविंदाला १० लाखांचं विमा संरक्षण
गोविंदा पथकांसाठी शासनाने विमा कवच द्यावा, अशी मागणी होत होती. या मागणीनुसार, दहीहंडी पथकातील गोविंदांना आता १० लाखांचं विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.