रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना एक वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागला. सदाभाऊ खोत आणि त्यांचे कार्यकर्ते आज पंढरपूरमधल्या सांगोल्यातून जात असताना त्यांचा ताफा एका हॉटेल चालकाने अडवला. कारण काय तर हॉटेलमध्ये जेवल्याचे पैसे दिले नसल्याचा आरोप त्या हॉटेल चालकाने केला.
2014 लोकसभा निवडणुकीत सांगोला तालुक्यातील मांजरी इथं अशोक शिनगारे यांच्या हॉटेलमध्ये सदाभाऊंचे कार्यकर्ते जेवले होते. पण त्या जेवणाचे पैसे दिले नव्हते. सदाभाऊ खोत यांना शिनगारे यांनी वारंवार फोन करूनही ते पैसे देत नसल्याने आज सांगोला पंचायत समिती येथे पंचायत राज समिती बैठकीसाठी आले असता शिनगारे यांनी खोत यांना अडवलं.
सदाभाऊ खोत यांनी शिनगारे यांच्याशी चर्चा करुन त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. जे काय असेल ते मिटवू असं सांगत सदाभाऊंनी हॉटेल चालकाला शांत करण्याचा प्रयत्न केला. हॉटेल चालक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून आपल्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप सदाभाऊ यांनी केला आहे.
सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण
पंचायत राज समितीच्या बैठकीसाठी सांगोल्यात आलो असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न आणि अंगावर येण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सदाभाऊ यांनी केला.
हा प्रकार निषेधार्ह आहे, पोलीस स्थानकात यांसंबधी आम्ही तक्रार केली आहे. एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. अशा पद्धतीने सदभाऊ खोत यांचा आवाज राष्ट्रवादी काँग्रेसला दाबता येणार नाही, आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढत राहू असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
2014 च्या निवडणुकीत तुमच्या हॉटेलमध्ये कोण लोक जेवायला आले होते, त्याची यादी द्या. किती लोक होते, हे तो दाखवत नाही. 10 वर्षे तो का गप्प होता? हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे आणि याच्यामागे राष्ट्रवादीच्या नेत्याचा हात आहे, असा आरोप खोत यांनी केला आहे.