दिल्ली न्यायालयाने बुधवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात नऊ दिवसांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत पाठवले. हे प्रकरण स्टॉक एक्सचेंज कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंग आणि हेरगिरीशी संबंधित आहे. विशेष न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी ईडीला पांडे यांची चौकशी करण्याची परवानगी दिली. या प्रकरणातील इतर आरोपींचा सामना करून पांडेंची चौकशी करायची आहे, असे एजन्सीने न्यायालयाला यापूर्वी सांगितले होते.
पांडेंनी फोन टॅप केल्याचा आरोप फेटाळला
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी ईडीतर्फे हजर राहून, तपास संस्थेकडे पांडेंची 14 दिवसांची कोठडी मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई पोलीस आयुक्तांनी महानगर टेलिकम्युनिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचा (एमटीएनएल) फोन टॅप करून बेकायदेशीर कृत्य केले असून त्यासाठी 454 कोटी रुपये दिले होते आणि ते या गुन्ह्याचे वाहक बनले, असे ते म्हणाले. पांडेंनी न्यायालयात सांगितले की, त्यांनी कधीही फोन टॅप केला नाही किंवा त्याच्यावर थेट नजर ठेवली नाही. या प्रकरणी त्यांना मंगळवारी ईडीने अटक केली होती.