महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) ऑनलाईन प्रणाली असणारी वेबसाईट डाऊन झाल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलं होतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यानंतर विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदतवाढ देखील दिली होती. मात्र, रविवारी देखील पुन्हा ऑनलाईन अर्ज प्रणालीत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. विद्यार्थ्यांपुढं अर्ज कसे सादर करायचे हा प्रश्न निर्माण झाला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ऑनलाईन अर्ज प्रणाली असणाऱ्या वेबसाईट मधील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आयोगानं जाहीर केलेल्या सर्व जाहिरातींची सुरु असणारी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणींची दखल घेत आयोगानं हा निर्णय घेतल्याचं कळतंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. वेबसाईटमधील तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर पुन्हा उमदेवारांना अर्ज सादर करण्यास योग्य मुदत देण्यात येईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
रविवारी दुपारच्या वेळी महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षेचे अर्ज सादर करत असताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येत होत्या. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल, असंही आयोगाकडून कळवण्यात आलं आहे.
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परिक्षा 2021 (जाहिरात क्रमांक 269/2021) तसेच दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा 2021 (जाहिरात क्रमांक 270/2021) करीता 17 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती, आता ऑनलाईन अर्ज करण्यास स्थगिती देण्यात आल्यानं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आहे.
काही उमेदवारांकडून प्रश्नचिन्ह
या डिजिटल युगात एवढ्या मोठ्या संस्थेची इतकी वाईट परिस्थिती यावी हे खूप दुर्दैवी आहे. अर्ज भरताना त्रास सहन करावा लागतोय, असं काही उमदेवारांनी म्हटलंय.