टी-20 पाठोपाठ विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलं. कोहलीनं शनिवारी टि्वटवर पोस्ट करुन कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. विराट कोहलीच्या राजीनाम्यानं सर्वांना धक्का बसल्याचं दिसून आलं आहे. कोहली अशा प्रकारचा निर्णय घेईल, असं कोणालाही अपेक्षित नव्हतं. विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर टीम इंडियाच्या माजी खेळाडूंकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. भारताला एकदिवसीय सामन्यांमधील पहिला विश्वचषक मिळवून देणाऱ्या कपिल देव (Kapil Dev) यानं देखील यावर भाष्य केलंय. विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून दबावामध्ये दिसत होता. कोहलीनं आता इगो सोडून नव्या कॅप्टनच्या नेतृत्त्वात खेळायला हवं, असं कपिल देव यानं म्हटलं आहे.
कपिल देव कडून विराटच्या निर्णयाचं स्वागत
कपिल देव यानं विराट कोहलीच्या निर्ण्याचं स्वागत करत असल्याचं मिड डे सोबत बोलताना म्हटलं आहे. “मी विराट कोहलीच्या निर्णयाचं स्वागत करतोय. टी-20 ची कॅप्टनसी सोडल्यानंतर तो खराब स्थितीचा सामना करत होता. अलीकडे तो चिंतेत दिसायचा. त्याला पाहून तो दबावात असल्याचं दिसून यायचं. यामुळं कॅप्टनसीचा राजीनामा दिल्यानंतर विराट त्याच्या स्वभावाप्रमाणं खेळता येईल, यासाठी त्यांनं हा निर्णय घेतला”, असं कपिल देव म्हणाले.
कपिल देव यानं विराट कोहलीनं हा निर्णय घेण्यापूर्वी विचार केला आहे. तो परिपक्व व्यक्ती आहे, माझा विश्वास असून त्यानं हा निर्णय घेण्यापूर्वी विचार केला असेल, विराट कोहलीला आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि त्याला शुभेच्छा द्यायला हव्यात, असंही कपिल देव म्हणाला.
कपिल देव यानं विराट कोहलीला सल्ला देताना त्यानं इगो सोडायला हवा आणि नव्या कॅप्टनच्या नेतृत्त्वात खेळायला हवं,असं म्हटलंय. सुनील गावस्कर माझ्या नेतृत्त्वात क्रिकेट खेळले, त्याच प्रमाणे ते कृष्णमच्चारी श्रीकांत आणि मोहम्मद अझरुद्दीन याच्या कॅप्टनसीमध्येही ते खेळले. विराटनं इगो सोडून क्रिकेट खेळल्यास भारतीय क्रिकेटसाठी फायदेशीर ठरेल. विराट कोहलीला आपण एक बॅटसमन म्हणून गमावू शकत नाही, असं कपिल देव म्हणाले.
विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटचं कॅप्टनपद सोडल्यानंतर तो वनडेचं कर्णधार पद भूषवतं होता. मात्र, बीसीसीआयनं वनडेच्या कॅप्टनपदावरुन विराट कोहलीला हटवलं. त्यानंतर विराट कोहलीनं स्वत:हून कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. विराट कोहलीनं आरसीबीचं देखील कर्णधारपद सोडलं होतं.