शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचे निधन

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N. D. Patil) यांचे आज सोमवारी निधन झाले. प्रकृती बिघडल्याने कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. आघाडीवर होते. सीमा भागात जाऊन त्यांनी लढे दिले व पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह होता. महाराष्ट्राच्या विरोधात कोणी ‘ब्र’ काढलाच तर शिवसेनाप्रमुखांच्या बरोबरीने ‘एन. डी.’ उभे राहिलेच म्हणून समजा. अखंड महाराष्ट्रात बेळगावसह सीमा भाग यावा हा त्यांचा ध्यास होता. एखाद्या वादळासारखे ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या लढ्यात उतरत. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते. एन. डी. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याचे अतोनात नुकसान झाले असून मी त्यांना महाराष्ट्र राज्यातर्फे आणि शिवसेनेतर्फे अभिवादन करतो,” अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

जेष्ठ नेते एन. डी. पाटील यांच निधनाने अतीव दुःख झाल्याची भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, आपल्या संपूर्ण आयुष्यात सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून त्यांनी संघर्ष केला. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या लढ्याचा आवाज आज शांत झाला आहे. शेतकरी, कामगारंसह एन. डी पाटील यांचे शिक्षणक्षेत्रातले अमूल्य योगदान देखील मोठे आहे. माझा आणि त्यांचा परिचय हा महाराष्ट्र- बेळगाव सीमावासीयांच्या लढाईत झाला होता. या लढ्यातील जी सुरुवातीची नेत्यांची फळी होती त्यातले एन. डी. पाटील हे एक महत्वाचे नाव होते. त्यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात आदराची भावना होती आणि ती कायम राहील. पाटील यांच्या निधनाने राज्याच्या सामाजिक, राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपले असून मी व माझे कुटुंबीय पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना करतो अश्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने गरीब, शेतकरी, कष्टकरी, तळागाळातील लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असून महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणातील एक तत्वनिष्ठ व संघर्षशील पर्व संपले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. नाना पटोले म्हणाले की, आपल्या सात दशकांहून अधिक काळच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीत एन. डी. पाटील साहेब कायम शेतकरी, कष्टकरी, तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आणि पुरोगामी विचारांशी प्रामाणिक राहिले.

उच्च शिक्षित असलेल्या एन. डी. पाटील साहेबांनी सुरुवातीच्या काळात अध्यापनाचे कार्य केले. शिवाजी विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेत महत्वाची पदे भूषवली. विधानसभा आणि विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी कायमच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सभागृहात अत्यंत आक्रमपणे आवाज उठवून ते सोडवण्याचा प्रयत्न केला. सीमाभागातील मराठी भाषकांच्या हक्कासाठी ते अखेरपर्यंत लढत होते. राजकारणासोबतच राज्याच्या सामाजिक चळवळ, शिक्षण, साहित्य आणि सहकार क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचे संपूर्ण आयुष्य आणि तळागाळातील लोकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायक असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.